नूडल्सच्या पाकिटांमध्ये २ कोटींचे हिरे, अंतर्वस्त्रात सोन्याची बिस्किटे, मुंबई विमानतळावर कोट्यवधींची तस्करी उघड
mumbai airport smuggling cases: मुंबई विमानतळावर श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाची सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात ३२१ ग्रॅम सोने लपविल्याचे आढळले.
मुंबई विमानतळ देशातील सर्वाधिक वर्दळीचे विमानतळ आहे. या विमानतळावरुन रोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. सोने, हिरे याची तस्करी करण्यासाठी विविध कृप्त्या शोधून काढतात. कधी अंतर्वस्त्रातून सोने नेण्याचा प्रयत्न करतात. कधी खाण्याच्या पाकिटात हिरे टाकतात. अगदी ऑपरेशन करुन शरीरातून सोने, हिरे नेण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु मुंबई विमानतळावर असलेल्या सीमा शुल्क विभागाच्या चाणाक्ष अधिकाऱ्यांच्या नजरेतून ते काही सुटत नाही. आता मुंबई विमानतळावर दोन कोटींचे हिरे आणि सहा कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबई विमानतळावरून बँकॉकला हिरे घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
नूडल्सच्या पाकिटांमध्ये हिरे
मुंबई विमानतळावरुन हिऱ्यांची तस्करी होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. यामुळे सर्वांची कसून चौकशी सुरु होती. एका व्यक्तीची तपासणी केली असता नूडल्सच्या पाकिटांमध्ये हिरे सापडले. त्या हिऱ्यांची किंमत २ कोटी २ लाख रुपये आहे. हा व्यक्ती मुंबईवरुन बँकॉकला जात होता.
सहा किलो सोने घेऊन जात होते
मुंबई विमानतळावर श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो येथून मुंबईत दाखल झालेल्या एका प्रवाशाची सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात ३२१ ग्रॅम सोने लपविल्याचे आढळले. तसेच अबुधाबी, दुबई, बहरिन, रियाध, मस्कत, बँकॉक आणि सिंगापूर येथून मुंबईत दाखल झालेल्या दहा प्रवाशांकडे एकूण ६ किलो १९९ ग्रॅम सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ४ कोटी ४ लाखांचे सोने व २ कोटी २ लाखांचे हिरे असा एकूण ६ कोटी ६ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई विमानतळावरुन तस्कारी करण्याचे प्रकार वाढले आहे. परंतु सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे हे सर्व प्रकार उघड होत आहे.