तळीरामांनो, जल्लोष करा, पण शुद्धीत राहून, नाही तर…, पार्ट्यांवर वॉच, नाक्यानाक्यावर पोलीस, तुमच्या शहरात काय तयारी?
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी सज्ज झालीय. आज पहाटेपासूनच साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येतेय.
मुंबई: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. राज्यातील नागरिकांनी तर गेल्या दोन दिवसांपासूनच पर्यटनाच्या ठिकाणी कुटुंबकबिला आणि मित्र परिवारासह हजेरी लावली आहे. हजारो पर्यटकांमुळे चौपाट्यांवर प्रचंड गर्दी झाली आहे. तर सर्वच पर्यटनस्थळ परिसरातील हॉटेल्स हाऊसफूल्ल झाले आहेत. आज संध्याकाळी नववर्षाच्या स्वागताचा ज्वर अधिकच चढणार आहे. त्यामुळे राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नाक्यानाक्यावर पोलीस आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच नववर्षाच्या निमित्ताने होणाऱ्या पार्ट्यांवरही पोलीस नजर ठेवून आहेत. खासकरून तळीरामांवर पोलिसांची नजर असणार असून पार्ट्यांमध्ये टुण्ण होऊन रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करणार आहे.
गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते बंद
सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. शहरात दोन वर्षाच्या नंतर होणाऱ्या सेलिब्रेशनमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक पोलीसानीही आपली तयारी सुरू केली आहे. मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून चार पोलीस उपायुक्त, 2000 वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.
शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अनेक मार्ग बंद करणार असून शहरातील अनेक ठिकाणी एकेरी मार्ग सुरू ठेवणार आहेत. त्याच बरोबर अपघातावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहराच्या 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर गेटवे ऑफ इंडिया परिसरातील अनेक ठिकाणी सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
मुंबईतील हे मार्ग राहणार बंद
मरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लाईओवरपर्यंत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या रस्त्यावर राहणार नो पार्किंग झोन
गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे.
बुलढाण्यात 29 हजार 800 परवाने
दारुविक्रातून महसूल मिळवण्यासाठी बुलढाण्यात देशी दारू विक्रेत्यांना 29 हजार 800 परवाने देण्यातआले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचा परवाना न घेताच होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. बुलढाण्यात मद्यविक्री उद्या पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नाशिकमध्ये वाहतूक कोंडी रोखणार
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून संपूर्ण शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातल्या वाहतुकीचा सगळ्यात मोठा अडथळा ठरणाऱ्या द्वारका चौफुलीवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थर्टी फर्स्टचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाची मोठी गर्दी झाली आहे. येथील पर्यटकांमुळे समुद्र किनारे गजबजून गेले असून हॉटेल रेस्टॉरंट हाऊसफुल्ल झाली आहेत.
ठाण्यात पोलिसांचा रुटमार्च
ठाण्यात आज आणि उद्या या दोन दिवसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सतर्क झाले आहेत. नौपाडा पोलिसांनी आज रुटमार्चही काढला. शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. शिवाय शहरात होणाऱ्या पार्ट्यांवरही पोलिसांचा वॉच असणार आहे.
पुण्यात हजाराचा दंड, वाहन जप्त होणार
पुण्यातील दोन प्रमुख रस्त्यांवर आज नो व्हेईकल झोन राहणार आहे. पुण्यातील एफसी रोड आणि एमजी रोड वाहनांसाठी बंद राहणार आहे. “ड्रिंक अँड ड्राईव्ह” करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. दारू पिऊन गाडी चालवण्या वाहनचालकांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच वाहन देखील जप्त करण्यात येणार आहे.
दोन वर्षाच्या कालावधीनंतर ब्रेथ अॅनालायझर वापरण्याचा निर्णयही वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यंदा 100 ब्रेथ अॅनालायझर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. “थर्टी फर्स्ट” साजरी करणाऱ्यांवर पोलिसांचे पथक नजर ठेवणार आहे.
लोणावळ्यात वाहतूक कोंडी
नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर शहराबाहेर पडले आहेत. याचा ताण पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आलाय. त्यामुळे बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहेत. आज विकेंड आहे. शिवाय लोक नववर्षाच स्वागत करणार असल्याने असंख्य वाहने रस्त्यावर आली आहेत.
नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे लोणावळ्यात दाखल झाले होते. त्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण वाढल्याचं चित्र आहे.
नंदूरबारमध्ये फौजफाटा
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचे स्वागत केले जाते आहे. त्यामुळे आप्रिय घटना टाळण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात जवळपास 500 पेक्षा अधिक कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
त्यासोबत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड ड्राईव्हबाबत विशेष मोहीम राबण्यात येत आहे. त्यासाठी नाकाबंदी लावण्यात आली असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, तरुणांनी दारू पिऊन वाहने चालवू नये, असे अहवान पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी केलं आहे.
शिर्डीत भाविकांची गर्दी
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी सज्ज झालीय. आज पहाटेपासूनच साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येतेय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून देशभरातून लाखो सहभागी आज शिर्डीत दाखल होतील.
सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय. नवीन वर्षानिमित्त साई समाधी मंदिर असेल, चावडी असेल, द्वारकामाई असेल या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे. आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेलीय.