मुंबईकरांचा रोजचा प्रवास महागणार?, रिक्षा भाडेवाढ करण्याच्या हालचाली
autorickshaw and taxi fares hike: भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) आला तर त्यात दिलेली कारणे वैध आहेत की नाही त्याचा अभ्यास केला जाईल. एमएमआरटीएकडून यापूर्वी ऑक्टोंबर 2022 मध्ये ₹2 आणि ₹3 रुपये रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ करण्यात आली होती.
मुंबईकरांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईतील रिक्षा प्रवास महाग होण्याची चिन्ह आहेत. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील रिक्षाच्या भाडेवाढीची मागणी रिक्षा चालक संघटनेकडून करण्यात आली आहे. बेसिक भाड्यात दोन रुपये तर प्रत्येक किलोमीटरसाठी एका रुपयापेक्षा जास्त भाडेवाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिक्षा संघटनेने बेसिक भाडे ₹23 वरुन ₹25 तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी ₹15.33 वरुन ₹16.9 दरवाढ करण्याची मागणी केली आहे. सीएनजीच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे रिक्षा चालकांना रोज 130-150 रुपयांचा भुर्दंड बसत असल्याचा दावा रिक्षा चालक संघटनेने केला आहे. तसेच महागाईदेखील वाढली आहे.
अशी आहे मागणी
रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, बेसिक भाड्यात ₹28 ते ₹30 पर्यंत वाढ करायची गरज आहे. परंतु यासंदर्भातील अंतिम मागणी करण्यापूर्वी सदस्यांशी चर्चा करणार आहे. टॅक्सी युनियनचे नेते प्रेम सिंग म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून खर्च वाढत आहे. परंतु त्या तुलनेत रिक्षेचे दर वाढले नाही. यामुळे युनियन लवकरच त्यांच्या प्रस्ताव देणार आहे.”
यापूर्वी कधी झाली भाडेवाढ
दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाकडे (एमएमआरटीए) आला तर त्यात दिलेली कारणे वैध आहेत की नाही त्याचा अभ्यास केला जाईल. एमएमआरटीएकडून यापूर्वी ऑक्टोंबर 2022 मध्ये ₹2 आणि ₹3 रुपये रिक्षा आणि टॅक्सीची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी रिक्षाचे कमीत कमी भाडे ₹21 वरुन ₹23 करण्यात आले होते. तर टॅक्सीचे भाडेवाढ ₹25 वरुन ₹28 करण्यात आले होते.
किती सीएनजी वाहने आहेत…
8 जुलै रोजी मुंबई महानगर प्रदेश (MMR) मध्ये CNG च्या किमती ₹73.50/kg वरून ₹75/kg पर्यंत केल्या होत्या. गेल्या काही वर्षांत सीएनजी वाहनांच्या वाढत्या मागणीनुसार हा दर वाढला आहे. MMR मध्ये 400,000 ऑटोरिक्षा, 500,000 खाजगी कार, 2,400 बस आणि 70,000 टॅक्सी यासह दहा लाखांहून अधिक CNG वाहने नोंदणीकृत आहेत.