अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; … तर संपत्तीही जप्त होणार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं आहे.
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात सिंग यांना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते. त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, सिंग यांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात सिंग यांना फरार घोषित करण्याबाबतचा अर्ज दिला होता. कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही कोर्टाने फरार घोषित केलं आहे. हे तिघे 30 दिवसाच्या आत कोर्टासमोर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
परमबीर सिंग यांच्याविरोधात एका अधिकाऱ्याने तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंग यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
हरियाणा ते मुंबई… कोण आहेत सिंग?
हरियाणामधील फरीदाबाद जिल्ह्यातील पावटा मोहबताबाद हे परमबीर सिंग यांचं मूळ गाव. त्यांचे वडील होशियार सिंग हरियाणा नागरी सेवेत अधिकारी होते. त्यांचा भाऊ मनवीर सिंग भडाना हरियाणा पब्लिक सर्विस कमिशनचे प्रमुख आहेत. परमबीर सिंग 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस खात्यात अनेक पदांवर काम केलं. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. त्यांनी सुरुवातीला ठाण्याचे पोलिस उपायुक्त म्हणून देखील काम केलं. यानंतर 2015 मध्ये त्यांची ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात झाली. या काळात त्यांनी ठाण्यातील अनेक मोठ्या प्रकरणांचा छडा लावला. त्यांच्या काळात ठाण्यातील गुन्ह्यांमध्ये जवळपास 10 टक्क्यांची घट झाली. तसेच विविध गुन्ह्यांमधील दोषी सिद्ध होण्याचं प्रमाण 8 टक्क्यावरुन 45 टक्के झाले.
परमबीर सिंग यांच्या नेतृत्वाखील ठाणे पोलिसांनी देशभरात गाजलेल्या प्रकरणांचा तपास केला. ठाणे पोलिसांनी मीरा रोड कॉल सेंटर प्रकरणी इक्बाल कासकरला अटक केली. ठाणे पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या नेतृत्वात सैन्य भरती प्रकरण, अमेरिकेच्या ड्रगविरोधी पथकाने लक्ष घातलेल्या 2000 कोटींचं ड्रग प्रकरण, बेकायदेशीर कॉल रेकॉर्डींग प्रकरण यांचा तपास केला. परमबीर सिंह यांनी चंद्रपूर आणि भंडऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केलं आहे.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 17 November 2021https://t.co/tpG6oVWeN8#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2021
संबंधित बातम्या:
पुणे बाजार समितीमध्ये आता एकरकमी पार्कींग शुल्क, बंदचा निर्णय मागे
शरद पवारांचा पुन्हा एकदा फडणवीसांना टोला, तर गडकरीचं कौतुक; हिंसाचाराच्या घटनेवरही भाष्य
कृषीपंपधारकांना महावितरणकडून नवसंजिवनी, 12 लाख शेतकऱ्यांना विजबिलात सवलत