मुंबईत 39,481 ठिकाणी डेंग्यू; तर 7,922 ठिकाणी मलेरियाच्या अळ्या सापडल्या, महापालिकेची माहिती
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्यातील कामगार - कर्मचारी
मुंबई : डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा आणि त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्यातील कामगार – कर्मचारी – अधिकारी हे तपासणीचे लक्ष्य निर्धारित करुन सातत्यपूर्ण पद्धतीने नियमितपणे तपासणी करत असतात.
गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील कोव्हिड साथ रोगासारख्या प्रतिकूल परिस्थीतीतही महानगरपालिकेचे कीटकनाशक खाते अव्याहतपणे कार्यरत आहे. या खात्याद्वारे यंदा जानेवारी पासून ते आतापर्यंतच्या साधारणपणे साडेसात महिन्यांच्या कालावधी दरम्यान करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान तब्बल 39 हजार 481 ठिकाणी ‘एडिस एजिप्ती’ (Aedes aegypti) या डेंग्यू प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या; तर 7 हजार 922 ठिकाणी मलेरिया वाहक ‘ऍनॉफिलीस स्टिफेन्सी’ (Anopheles stephensi) डासांच्या अळ्या आढळून आल्या असून ही डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आली आहेत. त्याचबरोबर याच कालावधीदरम्यान डासांची संभाव्य उत्पत्ती स्थळे ठरु शकणारे तब्बल 12 हजार 38 टायर्स आणि 2 लाख 80 हजार 987 इतर टाकाऊ वस्तू देखील हटविण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्यातील साधारणपणे 1 हजार 500 कामगार – कर्मचारी – अधिकारी हे अव्याहतपणे कार्यरत असून त्यांच्याद्वारे मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विविध भागांचे आणि इमारतींच्या परिसरांचे सर्वेक्षण आणि तपासणी नियमितपणे करण्यात येत असते. या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्री मध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर आणि त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या आणि त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या मधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येते.
या तपासणी दरम्यान डासांची उत्पत्ती स्थळे आढळून आल्यास ती उत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करण्यात येतात. विशेष म्हणजे ‘कोविड 19’ च्या पार्श्वभूमीवर ही सर्वेक्षण आणि तपासणी करताना मुखावरण (मास्क) वापरणे, हात मोजे (हॅन्ड ग्लोव्हज) वापरणे, शारीरिक दुरीकरण (फिजिकल डिस्टन्सिंग) काटेकोरपणे पाळणे यासारख्या बाबींची परिपूर्ण दक्षता घेतली जात असल्याचे राजन नारिंग्रेकर यांनी आवर्जून नमूद केले आहे.
डासांच्या उत्पत्ती स्थानांबद्दल आणि त्यांच्या जीवनचक्राबाबत थोडक्यात माहिती देताना नारिंग्रेकर यांनी सांगितले आहे की, या डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास 100 ते 150 अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे 3 आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान 4 वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे 400 ते 600 डास तयार होत असतात. हे डास डेंग्यू / मलेरिया सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची कार्यवाही नियमितपणे केली जात असते. तर पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा दरम्यान पाणी साचलेल्या ठिकाणांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन या कालावधीदरम्यान ही कार्यवाही मोहीम स्वरूपात केली जाते. या अंतर्गत आढळून आलेली डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट देखील केली जातात. ज्यामुळे डेंग्यू / मलेरिया इत्यादींच्या भविष्यातील संभाव्य प्रसारास आळा बसण्यास मोठी मदत होत असते. ही कार्यवाही प्रतिबंधात्मक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची व परिणामकारक आहे. तसेच या कामाचे वेगळेपण म्हणजे सर्वसामान्य नागरिक देखील आपापल्या स्तरावर याबाबतची काळजी सहजपणे घेऊन डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांना अटकाव करू शकतात.
महापालिका क्षेत्रात विविध रोगांवर नियंत्रण असावे आणि रोगांच्या प्रसाराला प्रतिबंध व्हावा म्हणून सार्वजनिक आरोग्य खाते, कीटकनाशक खाते यासारखे महानगरपालिकेचे विविध विभाग अविरतपणे कार्यरत असतात. तसेच औषध फवारणी, धूम्र फवारणी, डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करणे, यासारख्या विविध उपाययोजना देखील महानगरपालिकेद्वारे नियमितपणे करण्यात येत असतात.
- डेंग्यू आणि मलेरिया सारख्या रोगांचा प्रसार करणाऱ्या डासांची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या अळ्या उद्भवू नयेत; यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी; याबाबतची थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे आहे –
कुठे होते डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती?
गेल्या काही वर्षातील आकडेवारी बघितली असता एकूण डेंग्यूबाधित रुग्णांपैकी सुमारे 80 टक्के रुग्णांच्या घरांमध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या ‘एडीस इजिप्टाय’ डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आली होती. डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. सर्वेक्षणातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार डेंग्यू विषाणू वाहक डासांच्या अळ्या प्राधान्याने पाण्याचा पिंप, फेंगशुई झाड, बांबू प्लॅन्ट्स, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे; घराच्या सज्जामध्ये (गॅलरी) किंवा सभोवताली झाडांच्या कुंड्यांमधील अतिरिक्त पाणी जमा होण्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या (प्लेट्स), वातानुकुलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे यासारख्या विविध स्रोतांमध्ये अल्प प्रमाणात असलेल्या स्वच्छ पाण्यात देखील या डासांची उत्पत्ती आढळून आली आहे.
कुठे होते मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती?
मलेरियाच्या बाबतीत सुद्धा मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणाऱ्या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी’ डासाची उत्पत्ती देखील स्वच्छ पाण्यातच होते. मात्र या प्रकारच्या डासांची प्राधान्य उत्पत्तीस्थळे ही काही प्रमाणात वेगळी आहेत. उदाहरणार्थ, विहीरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलींग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी इत्यादी.
परिसरातील डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी
घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट – बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरीत नष्ट कराव्यात, असेही आवाहन महापालिकेच्या कीटक नाशक खात्याने यानिमित्ताने केले आहे.
का आणि कसा पाळावा कोरडा दिवस?
साठलेल्या पाण्यात डासांच्या विविध अवस्था या साधारणपणे आठ दिवसांपर्यंत असतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरामध्ये आणि घराशेजारील परिसरात साठविलेले किंवा साचलेले पाणी सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस घरातील पाणी साठवण्याची भांडी कोरडी ठेवून कोरडा दिवस पाळणेही अतिशय आवश्यक आहे.
अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात डासांच्या अळ्या आढळून येतात. याकरिता पाण्याचे पिंप हे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवावे. यासाठी सदर पिंप पूर्णपणे उलटे करुन ठेवल्यानंतर काही वेळाने हे पिंप कोरड्या आणि स्वच्छ कापडाने आतून पुसावे. कोरड्या फडक्याने पिंप आतून पुसत असतांना ते दाब देऊन पुसावे जेणेकरुन पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. नंतर या पिंपात पाणी भरल्यावर न विसरता स्वच्छ दुपदरी कपड्याद्वारे पिंपाचे तोंड बांधून ठेवावे, जेणेकरुन सदर पिंपात डासांची मादी अंडी घालू शकणार नाहीत, अशी माहिती महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे देण्यात आली आहे.
जागतिक डास दिन (World Mosquito Day)
20 ऑगस्ट 1897 या दिवशी तत्कालीन भारतीय वैद्यकीय सेवेतील (Indian Medical Service) डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरिया या रोगाचा प्रसार डासामुळे होतो, ही बाब सिद्ध केली होती. या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जगभरात जागतिक डास दिन पाळला जातो. या संशोधनाबद्दल डॉ. रॉस यांचा सन 1902 चा नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. डॉ. रॉस यांचा जन्म उत्तर भारतातील अलमोडा या गावी 13 मे 1857 रोजी झाला होता. डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांच्या संशोधनामुळे मलेरिया या रोगाचा प्रसार डासांद्वारे होतो, ही बाब सिद्ध झाली. ज्यामुळे मलेरियाला आळा घालण्यासाठी नक्की काय काळजी घ्यावी? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासह योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे शक्य झाले.
डेंग्यू, मलेरिया सारख्या पावसाळी आजारांमुळे कोव्हिड संसर्गाचा धोका दुप्पट, डॉक्टरांनी दिला इशाराhttps://t.co/T0FvJ8aWCp | #Malaria | #Covid_19 | #Healthcare | #Food | #Mumbai | #Maharashtra | #Health |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या :
नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच, 383 घरांमध्ये अळी आढळल्या
वाशिम-गोंदियात कोरोनानंतर नवं संकट, ‘या’ आजाराच्या पहिल्या बळीने खळबळ