आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड; 10 ठिकाणी ईडीची छापेमारी
Mumbai ED Raid on Suraj Chavan Home : आधी सुजित पाटकर अन् आता सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची छापेमारी; 10 ठिकाणी ईडीचं धाडसत्र
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. के के ग्रँड या चेंबुरमधील इमारतीत 11 व्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. या ठिकाणी ईडीनं धाड टाकली आहे.
सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास ईडीचं पथक सूरज चव्हाण यांच्या घरी दाखल झालं. पाच अधिकाऱ्यांचं पथक चव्हाण यांच्या घरी दाखल झालं आणि त्यांनी चौकशी सुरू झाली.
कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणी ईडी आज चौकशी करत आहे.
सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरीही ईडीने धाड टाकली आहे. एकूण 10 ठिकाणी ईडीने कारवाई करत आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. सुजित पाटकर यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं. पण या कंपनीने घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणी आता ईडी तपास करत आहे.
कोरोना घोटाळा प्रकरणी राज्य शासनानं एसआयटी गठीत केली आहे. यामार्फत चौकशी केली जाणार आहे. त्याच बरोबर उद्धव ठाकरे यांनी काल घेतलल्या पत्रकार परिषदेत 1 जुलैला मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर आज सकाळी ईडीनं धाडसत्र सुरू केलं आहे. त्यामुळे या चौकशीमागे राजकीय गोष्टी आहेत का? असा सवाल उपस्थित होतो आहे.
भाजप आणि शिंदे गट हे सूडाचं राजकारण करत आहे. पण आमचे नेते हे स्वच्छ आहेत. त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यामुळे कितीही चौकशी केली तरी यांना काहीही सापडणार नाही. आमचे नेते यातून सुटतील, अशी भावना सूरज चव्हाण यांच्या घराजवळ जमलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.