Eknath Khadse | एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची लॉटरी ? राष्ट्रवादीकडून उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

| Updated on: Jun 07, 2022 | 10:41 AM

विधानपरिषदेसाठी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून काल रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाथाभाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse | एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची लॉटरी ? राष्ट्रवादीकडून उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रचंड नाट्यमय घडामोडी घडत असतानाच विधान परिषद निवडणूक प्रक्रियेलाही वेग आला आहे. राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. विधान परिषद उमेदवारीवर चर्चा करण्याकरिता काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याला उतरवायचं, यावर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यात एकनाथ खडसे यांचं नाव प्राधान्यानं पुढे आलं असून लवकरच नाथाभाऊंच्या नावाची घोषणा केली जाईल. भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नाथाभाऊंना गेल्या कित्येक दिवसांपासून राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा होती. विधानपरिषद उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली तर ही त्यांच्यासाठी मोठी संधी समजली जात आहे.

20 जून रोजी निवडणूक

महाराष्ट्रात एकिकडे बऱ्याच वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक 10 जून रोजी होत आहे. तर विधानपरिषदेची निवडणूक देखील 20 जून रोजी होणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9जून आहे. त्यामुळे अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आवश्यकता आहे.

नाथाभाऊंचं पुनर्वसन होणार का?

भाजपच्या फडणवीस मंत्रीमंडळावर नाराजी दर्शवत भाजपामधून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला होता. त्यानंतर विधीमंडळात प्रवेश करण्यासाठी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा प्रस्तावही होता. मात्र ही यादीच दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. आता विधानपरिषदेसाठी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून काल रात्री झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नाथाभाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

उमेदवारी मिळाली नाही तर…

भाजपा नेतृत्वाने संधी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या खडसेंना पक्षाकडून खूप अपेक्षा आहेत. गे्लया दीड वर्षांपासून ते संधीच्या शोधात आहेत. आता विधानपरिषदेतही खडसेंना संधी मिळाली नाही तर खडसे समर्थकांमध्ये नाराजीची भावना अधिक गडद होईल.

राष्ट्रवादीला काय लाभ ?

पश्चिम महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला खानदेशातून एकनाथ खडसेंसारखा मजबूत नेता मिळाला. त्यामुळे या प्रदेशातही पक्ष विस्तार करण्यास राष्ट्रवादीला संधी आहे. खुद्द शरद पवार यांनीही आता खानदेशात राष्ट्रवादीची भरभराट होईल, अशी आशा व्यक्त केली होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंना विधान परिषद उमेदवारी दिल्याने या प्रदेशातील प्रभाव वाढवणं राष्ट्रवादी काँग्रेसला सोपं जाईल. या भागातील भाजपच्या गिरीश महाजनांसमोर खडसे समर्थकांचं आव्हान उभं करता येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंना ही संधी देण्याची गांभीर्याने चर्चा सुरु आहे.