Mumbai Exit Poll 2024: मुंबई कोणाची? महायुती की महाविकास आघाडी, अॅक्सिसचा एग्झिट पोलमध्ये धक्कादायक निष्कर्ष
Maharashtra Eelction Exit Poll Results 2024: लोकसभा निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. परंतु विधानसभेतील निकाल वेगळेच येण्याची शक्यता एग्झिट पोलनुसार दिसत आहे. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांनाही बसणार आहे.
Maharashtra Eelction Exit Poll Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर एग्झिट पोलचे निष्कर्ष समोर आले. आता एग्झिट पोलचे विभागानुसार निष्कर्ष समोर आले आहे. त्यात मुंबई कोणाची? मुंबईकरांनी कोणाला पसंती दिली? ही माहिती आली आहे. यामध्ये ठाकरे बंधूंना धक्का बसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जादू मुंबईत चालली नसल्याचे दिसून आले. मुंबईतील 36 जागांपैकी अनेक जागांवर महायुतीने वर्चस्व मिळाले आहे.
कोणाला किती जागा
अॅक्सिस माय इंडियाच्या सर्व्हेनुसार मुंबईतील 36 जागांपैकी 22 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होत आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 14 जागांवर विजय मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय इतर कोणाताही उमेदवार विजय होत नाही. यामुळे राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे यांचा पराभव होत असल्याचे या सर्व्हेमधून दिसत आहे. आता या ठिकाणी महायुती की महाविकास आघाडी हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. सर्व्हेतील दावा फोल ठरवून अमित ठाकरे विजयी होतात का? हे सुद्धा त्याच वेळी स्पष्ट होणार आहे.
अशी आहे टक्केवारी
लोकसभा निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. परंतु विधानसभेतील निकाल वेगळेच येण्याची शक्यता एग्झिट पोलनुसार दिसत आहे. त्याचा फटका उद्धव ठाकरे यांनाही बसणार आहे. मुंबईतील 36 जागांपैकी 45 टक्के मत महायुतीच्या खात्यात जाताना दिसत आहे. तसेच 43 टक्के मत महाविकास अघाडीला मिळत आहे. तसेच बहुजन विकास आघाडीकडे दोन टक्के मते जात आहे. तो फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.
दोन्ही शिवसेनेसाठी मुंबईचे महत्व
मुंबईचा निकाल उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे. मुंबई मनपावर अनेक वर्ष शिवसेनेचे वर्चस्व आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा कल मनपात असण्याची शक्यता आहे. मुंबईकर कोणत्या शिवसेनेला आपली पसंती देणार? हे आता 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.