Mumbai Fire: आग कशी विझवायची? मुंबई महापालिका देणार धडे; बीएमसीचे वरातीमागून घोडे
नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे.
मुंबई: नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता अशी दुर्घटना घडल्यास मुंबईकरांना आग विझवण्याचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
नाना चौकातील इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. आदित्य ठाकरे आणि महापौर पेडणेकर यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या दुर्घटनेची माहिती घेतली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची सांत्वना केली. तसेच जखमींची विचारपूस केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आदित्य यांनी ही माहिती दिली.
धुरामुळे नागरिकांना अधिक त्रास
आगीची घटना ही दुर्दैवी असून इमारतीमधील रहिवाश्यांसोबत केलेल्या चर्चेप्रमाणे धुरामुळे नागरिकांना जास्त त्रास झाला. आगीमुळे खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा अग्निशमन विभागाच्या ऑडिटनंतर पूर्ववत करण्यात येणार आहे. आग लागल्यानंतर आग कश्या पद्धतीने विझवावी, यावेळी कसे काम केले पाहिजे याचे नागरिकांना बृहन्मुंबई महापालिका प्रशिक्षण देणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी
आगीची घटना दुर्देवी असून आग लागल्यानंतर तात्काळ घटनास्थळावर महापालिकेचे अग्निशमन दल पोहोचले होते. जितक्या लोकांना बाहेर काढणे शक्य झाले तितक्या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला आहे. त्यासोबतच माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांच्या टीमने सुद्धा बऱ्याच नागरिकांना इमारतीबाहेर काढण्याचे काम केले. नायर व कस्तुरबा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली त्यांना धीर दिला, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
वीजपुरवठा यंत्रणा सहा महिन्यातून एकदा वापरा
आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता, वीजपुरवठा करणारी यंत्रणा ही सहा महिन्यातून एकदा तपासली गेली पाहिजे. त्यासोबतच आठवड्यातून शनिवार व रविवारला उंच इमारतीमधील नागरिकांचे विविध गट तयार करून त्यांना अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका स्तरावर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
सहा जणांचा मृत्यू, 30 जखमी
या इमारतीच्या 19 व्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेत 30 जण जखमी झाले आहे. तर तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझली असून आग विझविण्यासाठी 13 फायर इंजिन व 7 जंम्बो टॅंकरचा वापर करण्यात आला.
संबंधित बातम्या:
Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Mumbai Fire : भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू, 15 जखमी