नवी दिल्ली, मुंबई : ओडीशामध्ये 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा 3 जून रोजी होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कोकणातून जाणाऱ्या वंदे भारतचे उद्घाटन मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होते. मात्र, ओडिशामधील अपघातानंतर हा कार्यक्रम रद्द झाला अन् त्याच दिवशी रिकामी गाडी मुंबईला परत आली. ओडिशात येथील अपघातामुळे रेड सिग्नल मिळालेल्या या गाडीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस कधी धावणार त्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.
कोकणवासीय ज्या बहुचर्चित रेल्वेची प्रतिक्षा करत होते, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच रेल्वे 27 जूनपासून धावणार आहे. या नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होईल. या गाड्यांच्या समावेशामुळे या शहरांतील रहिवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, त्यांना आरामदायी आणि आधुनिक वाहतुकीचे साधन मिळेल.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल. जर तुम्हाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सुटेल. दुपारी १.१५ वाजता गोव्याला पोहोचेल. ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही ती थांबणार आहे.
या ट्रेनमध्ये एससी चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे एकूण 8 डबे आहेत. जर तुम्ही चेअर कारने प्रवास करत असाल तर तुमचे भाडे 1100 ते 1600 दरम्यान असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 2200-2800 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
मुंबई ते गांधीनगर भाडे
मुंबई ते सोलापूर भाडे