Gunratna Sadavarte | माझी हत्या होऊ शकते, लोकशाहीचा गळा घोटला जातोय; कोर्टात जाताना गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य
7 एप्रिल रोजी सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप असून याचप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतील किला कोर्टात या प्रकरणी सुनावणी होत आहे.
मुंबई | माझी हत्या होऊ शकते. लोकशाहीचा गळा घोटला जातोय, असं खळबळजनक वक्तव्य एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केलं. सदावर्ते यांना एसडी मार्ग पोलीस स्टेशनमधून (Police station) किला कोर्टात नुकतंच नेण्यात आलं. त्याठिकाणी सदावर्ते यांच्यावरील आरोपांवरील सुनावणी होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर वक्तव्यांचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कालच त्यांना ताब्यात घेतलं असून आज किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. कोर्टात जाताना गुणरत्न सदावर्ते यांनी आपली हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनीदेखील काल अशा प्रकारची भीती व्यक्त केली होती.
किला कोर्टात सुनावणी
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांची प्रक्षोभक भाषणं जबाबदार आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. 7 एप्रिल रोजी सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रक्षोभक विधानं केल्याचा आरोप असून याचप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मुंबईतील किला कोर्टात या प्रकरणी सुनावणी होत आहे.
सदावर्तेंची बाजू कोण मांडणार?
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील असलेले गुणरत्न सदावर्ते यांची किला कोर्टात सुनावणी सुरु आहे. न्यायमूर्ती के जी सावंत खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होईल. तर गुणरत्न सदारवर्ते यांच्या बाजूने महेश वाधवानी, घनश्याम उपाध्यय आणि सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील हे तिघे युक्तीवाद करत आहेत.
पत्नी जयश्री पाटील यांनीही भीती व्यक्त केली
दरम्यान, काल शुक्रवारी रात्री गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनीदेखील गुणरत्न सदावर्ते यांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतर आज स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनीही लोकशाहीचा गळा घोटला जात असून माझी हत्या होऊ शकते, असं वक्तव्य केलं आहे.
मुलगी झेनला ‘सॉरी’
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना किला कोर्टात हजर करताना दरम्यानच्या मार्गात त्यांची पत्नी आणि दहा वर्षांची मुलगी झेन हीदेखील हजर होती. मुलीला उद्देशून गुणरत्न सदावर्ते यांनी ‘सॉरी’ असं वक्तव्य केल्याचीही माहिती मिळतेय. मात्र सदावर्ते यांचं हे सॉरी नेमकं कशासाठी आहे, याबद्दल आता चर्चा सुरु आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सिल्व्हर ओकवर..
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांची किला कोर्टात सुनावणी सुरु असताना, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. काल शुक्रवारी दुपारी शरद पवार यांच्या याच निवासस्थानी शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. जमावानं शरद पवार यांच्या घरावर चप्पलफेक आणि दगडफेक केली. त्यामुळे शुक्रवारी या परिसरात काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर बातम्या-