मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसानंतर बुधवारी रात्री मालाडमध्ये मोठी इमारत दुर्घटना घडली. त्यापाठोपाठ आता दहिसरमध्येही 3 घरं कोसळल्याची माहिती समोर आलीय. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चव्हाण चाळ शंकर मंदिराजवळ केतकीपाडा दहिसर पूर्व या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. घराखालची माती सरकल्यामुळे 3 घरं कोसळली. यात प्रद्युम्न सरोज नावाच्या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु आहे. ( 3 houses collapse in Ketkipada area in Dahisar East)
दहिसर पूर्वच्या केतकीपाडा परिसरात ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरु आहे. ढिगाऱ्याखाली कुणी अडकून पडलं आहे का? याचा तपास सध्या सुरु आहे. 3 घरं कोसळल्यामुळे काहीजण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश आहे. तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले 10 वर्षाच्या आतील आहेत. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालयात ( शताब्दी रुग्णालय) जाऊन सदर दुर्देवी घटनेत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, महापालिकेचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींना तातडीने रुग्णालयांत नेऊन शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले होते.
संबंधित बातम्या :
Malad building collapse : एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू, दूध आणण्यास गेलेले मोहम्मद रफी बचावले
Malad Building Collapsed | मालाड इमारत दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, 7 गंभीर, पाहा संपूर्ण यादी
3 houses collapse in Ketkipada area in Dahisar East