मुंबई लोकल इतिहास जमा होणार, मुंबईकरांना मिळणार 238 वंदे भारत मेट्रोची भेट
Vande Bharat Metro : मुंबईकर अन् लोकल हे एक अतुट नाते झाले आहे. परंतु काळानुसार बदलत लोकलला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता लोकलच्या जागी वंदे भारत मेट्रो येणार आहे. मुंबईसाठी 238 वंदे भारत मेट्रो घेण्यात येणार आहे.
मुंबई : देशात पहिली लोकल मुंबईत 3 फेबुवारी 1925 मध्ये धावली होती. आता त्यानंतर 98 वर्षांनंतर लोकलसाठी पर्याय तयार करण्यात आला. वंदे भारत एक्स्प्रेससारखी दिसणारी वंदे मेट्रो (Vande Metro) मुंबईतून लवकरच धावणार आहे. यामुळे उपनगरीय प्रवासाचा वेगळा अनुभव मिळणार आहे. तसेच कमी वेळेत त्यांना हे अंतर गाठता येणार आहे. मुंबईकरांना 238 वंदे भारत मेट्रोची भेट मिळणार आहे. त्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.
मुंबईत मिळणार 238 वंदे मेट्रो
मुंबईची लाइफलाइन लोकलच्या जागी पर्याय येणार आहे. मुंबई महानगरात वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरु होणार आहे. मुंबई रेल्वे विकास निगमच्या (MRVC) अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईसाठी 238 Vande Bharat Metro Train ची खरीदी होणार आहे. रेल्वे बोर्डने यालाही मंजुरी मिळाली आहे. ही खरेदी मुंबई अर्बन ट्रन्सपोर्ट प्रोजेक्ट-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) अंतर्गत होणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी खर्च उचलणार आहे. त्यानंतर रेल्वेच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसची आवृत्ती
रेल्वेने सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस सुरु केली आहे. बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. आता कमी अंतर जलदगतीने करण्यासाठी वंदे भारतच्या धर्तीवर वंदे मेट्रो ट्रेन सुरु करणार आहे. यामुळे लवकरच लोकलच्या जागी वंदे भारत एक्स्प्रेससारखी दिसणारी ‘वंदे मेट्रो’ धावणार आहे.
वंदे मेट्रो ही स्वदेशी ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत रुळावर धावण्यास सुरुवात होईल. वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन जूनपर्यंत समोर येईल. ही ट्रेन भारतीय रेल्वेसाठी क्रांतिकारी बदल ठरेल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले होते. वंदे मेट्रो ट्रेन 1950 आणि 1960 च्या दशकात डिझाइन केलेल्या अनेक ट्रेनची जागा घेणार आहे.
वेग काय असणार
वंदे मेट्रोमध्ये इंटरसिटी गाड्यांप्रमाणे फक्त आठ ते दहा डबे असतील. वंदे मेट्रो ट्रेनचा वेग 120 ते 130 असेल. जवळच्या स्थानकांमधून ते थोड्याच वेळात शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पोहोचेल. मेट्रोप्रमाणेच यात स्वयंचलित दरवाजे, एलईडी स्क्रीन असतील.