मुंबईतील तासाभराचा प्रवास 22 मिनिटांत, मुंबईकरांना मिळणार पुढील महिन्यापासून ही सुविधा
mumbai metro route 3: गेल्या 100 वर्षांतील पावसाचा अभ्यास करून मेट्रो-3 ची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस होऊनही मेट्रोपर्यंत पाणी पोहोचणार नाही.
मुंबईतील प्रवास हा जिकारीचा असतो. लोकलमधून नियमित प्रवास करणे मुंबईकरांसाठी एक दिव्यच असते. त्यानंतर मेट्रो सेवा आल्यावर मुंबईकरांचा प्रवास सुखाचा झाला आहे. आता मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा सुरु होणार आहे. यामुळे एका तासाचा प्रवास केवळ 22 मिनिटांत होणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉरपोरेशनचे (एमएमआरसी) एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितले की, आरे ते बीकेसी हा टप्पा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. यामुळे हा प्रवास केवळ 22 मिनिटांत होणार आहे. सध्या या प्रवाशासाठी जवळपास एक तास लागतो. मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डने पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच आता स्थानकांसाठी सीएमआरएस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कागदपत्रे तयार केली जात आहेत.
आरे ते बीकेसी मेट्रो रेल्वे दरम्यान 9 स्टेशन आहेत. त्याचे काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा 12.44 किमीचा असून त्यावर मेट्रोच्या 96 फेऱ्या होणार आहे. सकाळी 6.30 ते रात्री 10.30 दरम्यान मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. या मार्गावर दर 6.30 मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल. एकदा संपूर्ण मार्गावर सेवा सुरू झाल्यानंतर ही वेळ 6 मिनिटांची होणार आहे.
किती असणार भाडे
मेट्रो-3 च्या पहिल्या टप्प्यात प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 10 ते 50 रुपये मोजावे लागणार आहेत. संपूर्ण मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना सुमारे 70 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मार्च 2025 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितले की, गेल्या 100 वर्षांतील पावसाचा अभ्यास करून मेट्रो-3 ची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस होऊनही मेट्रोपर्यंत पाणी पोहोचणार नाही. मेट्रो-3 कॉरिडॉर शहरातील अनेक महत्त्वाच्या संकुलांजवळून जाणार आहे. एकदा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे 6.30 लाख वाहने रस्त्यावरून कमी होण्याची अपेक्षा आहे. मेट्रो-1 आणि मेट्रो-7 सह कनेक्टिव्हिटीमुळे इतर मेट्रो मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवासही सुकर होणार आहे.