…तर ठाकरेंचे 14 आमदारही अपात्र ठरवले असते; शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान
Shambhuraj Desai on Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar Judgement : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर शिंदे गटातील मंत्र्यांची प्रतिक्रिया काय? तर ठाकरेंचे 14 आमदारही अपात्र ठरवले असते, असं शिंदे गटातील मंत्री का म्हणाले? या निकालावर नेमकी प्रतिक्रिया काय? वाचा सविस्तर...
मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. त्याचबरोबर शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. यावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप राऊतांनी केला. त्याला आता महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. जर ही मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांही अपात्र ठरवलं गेलं असतं, असं शंभुराज देसाई म्हणालेत.
निकालाबाबत देसाई यांचं मत काय?
राहुल नार्वेकर यांनी काल जो निकाल दिला. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपलं मत मांडलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय दिला आहे. ठाकरे गटाकडून 16 जणांच्या अपात्रतेची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पडून हा निर्णय दिला गेला. 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची हे अध्यक्षांनी सांगितलं. आम्ही 54 पैकी 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. दुसऱ्या गटात गेलेलो नाही. त्यामुळे काल जो निर्णय आला तो योग्यच आहे, असं देसाई म्हणाले.
संजय राऊतांना टोला
विश्वप्रवक्ते ज्या मॅच फिक्सिंगचा आरोप करत आहेत. ते निकाल येईपर्यंत विश्वास ठेवून होते. निकाल आल्यानंतर विश्वास उडाला. जर मॅचफिक्सिग असती तर ठाकरे गटाचे 14 आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावं. शरद पवारसाहेबांनीही बुस्टर डोसं दिला आहे. तर त्यांनी न्यालयात जावं. आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
“तेव्हा ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला”
शिवसेना-भाजप या नैसर्गिक युतीत आम्ही निवडून आलो आहोत. असं असताना उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांच्यासोबत इच्छेविरूद्ध सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करताना दोन ते तीन हॉटेलमध्ये आम्हाला ठेवलं होतं. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचं सरकार असलं पाहिजे हे वारंवार म्हणत होतो. पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला, असं देसाई म्हणाले.