मुंबई महापालिकेची एकाच दिवसात बक्कळ कमाई, 8 मार्चला 416 कोटींचा मालमत्ता कर जमा
यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी जमा झालेली एकूण रक्कम ही 3 हजार 486 कोटी रुपये इतकी झाली आहे (Mumbai Municipal Corporation deposits property tax of Rs 416 crore in a single day).
मुंबई : मुंबई महापालिकेकडे यंदाचा मालमत्ता कर जमा करावयाची अंतिम तारीख 8 मार्च 2021 अशी होती. मालमत्ता कर भरावयाच्या या शेवटच्या दिवशी 415 कोटी 85 लाख रुपये एवढ्या मालमत्तचा कराचा भरणा नागरिकांद्वारे करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी जमा झालेली एकूण रक्कम ही 3 हजार 486 कोटी रुपये इतकी झाली आहे (Mumbai Municipal Corporation deposits property tax of Rs 416 crore in a single day).
यावर्षी महापालिकेचं 5 हजार 200 कोटींचे लक्ष्य
यावर्षी मालमत्ता कर वसुलीचे रुपये 5 हजार 200 कोटींचे लक्ष्य असून, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे मालमत्ता कर वसुलीच्या कार्यवाहीचा सातत्याने आढावा घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात याबाबत सूक्ष्मस्तरीय नियोजन आणि अंमलबजावणी नियमितपणे करण्यात येत आहे (Mumbai Municipal Corporation deposits property tax of Rs 416 crore in a single day).
अधिकाऱ्यांचं नागरिकांना मालमत्ता कर वेळेवर भरण्यातं आवाहन
दरम्यान, कर निर्धारण आणि संकलन खात्याचे सह आयुक्त श्री. सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा; जेणेकरुन थकीत मालमत्ता कर रकमेवर दरमहा दोन टक्के रकमेची दंडात्मक आकारणी; जल जोडणी खंडित करणे, चल संपत्ती जप्त करणे, अटकावणी (Attachment) करणे यासारखी विविध स्तरीय कारवाई टाळता येईल.
कराची भरणा न करणाऱ्यांविरोधात नेमकी कोणती कारवाई?
मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना महापालिकेद्वारे अव्याहतपणे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या सेवा-सुविधा नियमितपणे देण्यामध्ये नागरिकांकडून कर रुपात गोळा होणाऱ्या महसुलाची महत्त्वाची भूमिका असते. ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी आपला मालमत्ता कर वेळेत जमा करावा, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वारंवार विनंती आणि सूचना करण्यात येत असतात. मात्र, असे प्रयत्न करुनही वेळेत मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर दरमहा आवर्ती दराने शिल्लक रकमेवर 2 टक्के दंडाची आकारणी देखील केली जाते. तर त्यानंतर देखील मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांबाबत संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाते. तर त्यापुढील टप्प्यात चल संपत्ती जप्त करण्याची, अटकावणीची (Attachment) कारवाई देखील केली जाते.
महापालिका कर न भरणाऱ्यांकडून अशापद्धतीने वसुली करते
गेल्या आर्थिक वर्षापासून मालमत्ता कर न भरणाऱ्यांची चल संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या अंतर्गत दुचाकी, चारचाकी, विविध प्रकारची वाहने, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा (A.C.) यासारख्या वस्तू जप्त करण्यात येत आहेत. या वस्तू जप्त केल्यानंतर ५ दिवसांच्या आत थकीत कराची वसुली न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत कराची वसुली करण्याची तदतूद करण्यात आली आहे.
मालमत्ता कर वसुलीचे टप्पे
1) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराची देयके प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे.
2) जे मालमत्ता धारक 90 दिवसांच्या मुदतीत मालमत्ता कर भरत नाहीत, त्यांच्यावर टप्पेनिहाय कारवाई सुरु करण्यात येते. त्याचबरोबर मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर आवर्ती पद्धतीने दरमहा 2 टक्के या दराने दंड आकारणी करण्यास देखील सुरुवात केली जाते.
3) टप्पेनिहाय कारवाई अंतर्गत सर्वप्रथम महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून देयक भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही देयक अदा न केल्यास ‘डिमांड लेटर’ पाठविले जाते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात 21 दिवसांची अंतिम नोटीस मालमत्ता धारकास दिली जाते.
4) त्यानंतरच्या टप्प्यात मालमत्ता किंवा मालमत्तेचा काही भाग ‘सील’ (मोहोरबंद) करण्याची कारवाई; त्यानंतर मालमत्ता व्यवसायिक स्वरुपाची असल्यास जलजोडणी खंडित करण्याची कारवाई आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मालमत्ता अटकावणीची (Property Attachment) कारवाई करण्यात येते.
5) या व्यतिरिक्त ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888’ मधील कलम 204 व 205 अन्वये दुचाकी, चारचाकी, वाहने, फर्निचर, टिव्ही, फ्रीज, वातानुकूलन यंत्रणा यासारख्या चल संपत्ती असणाऱ्या बाबी जप्त करण्याची कारवाई देखील गेल्या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. यानुसार सदर वस्तू जप्त केल्यानंतरही थकीत कराची वसुली पाच दिवसात न झाल्यास सदर वस्तुंचा जाहीर लिलाव करुन त्याद्वारे थकीत करांची वसुली केली जाते.
मालमत्ता कर भरण्यासाठीचे पर्याय
महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना त्यांचा मालमत्ता कर सुलभतेने भरता यावा, यासाठी विविध पर्याय महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पुढील पर्यायांचा समावेश आहे:
1) बृहन्मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्रात (Citizen Facilitation Centre / CFC) मालमत्ता करांचा भरणा रोख रकमेच्या स्वरुपात करता येतो.
2) नागरिक सुविधा केंद्रात (Citizen Facilitation Centre / CFC) मालमत्ता कर रकमेचा ‘धनादेश’ (चेक) किंवा ‘धनाकर्ष’ (डिमांग ड्राफ्ट) जमा करुन देखील मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. मालमत्ता कर देयकामध्ये नमूद केलेल्या तपशीलानुसार ‘धनादेश’ (चेक) किंवा ‘धनाकर्ष’ (डिमांग ड्राफ्ट) असणे आवश्यक आहे.
3) मालमत्ता कर देयकावर महानगरपालिकेचे बँक खाते क्रमांक नमूद केलेले असतात. या बँक खाते क्रमांकावर ‘एनईएफटी’ किंवा ‘आरटीजीएस’ द्वारे देखील ऑनलाईन पद्धतीने करांचा भरणा करता येतो.
4) बृहन्मुंबई महापालिकेच्या portal.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्यपानावर नागरिकांकरिता (For Citizens) या पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर उघडणा-या ‘ड्रॉपडाऊन मेनू’ मध्ये ‘मालमत्ता कर’ असा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायावर ‘क्लिक’ केल्यानंतर उघडणा-या पानावर ‘मालमत्ता खाते क्रमांक’ (Property UID) नमूद करुन संबंधित मालमत्तेवरील करांचा भरणा करता येऊ शकतो.
5) वरील संकेतस्थळासह ‘MyBMC 24×7’ या ‘ऍन्ड्रॉईड ऍप’ द्वारे देखील ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरता येऊ शकतो. हे ऍप ‘प्ले स्टोअर’ वर मोफत उपलब्ध आहे.