सुविधांचा अभाव, नियमांची पायमल्ली, निष्काळजीपणा.. मुंबईतील बोट अपघाताला जबाबदार कोण?

मुंबईतील 'गेट वे ऑफ इंडिया' इथून एलिफंटासाठी रवाना झालेल्या 'नीलकमल' या बोटीतील प्रवाशांसाठी बुधवारचा दिवस काळा दिवस ठरला. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या जोरदार धडकेनंतर ही बोट कलंडली आणि बुडाली. यात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुविधांचा अभाव, नियमांची पायमल्ली, निष्काळजीपणा.. मुंबईतील बोट अपघाताला जबाबदार कोण?
Mumbai Boat AccidentImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2024 | 1:09 PM

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून एलिफंटाला आणि अलिबागला जाण्यासाठी दररोज असंख्य प्रवासी फेरीने प्रवास करतात. मात्र बुधवारचा दिवस ‘नीलकमल’ या फेरीतील प्रवाशांसाठी काळा दिवस ठरला. बुधवारी दुपारी ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून घारापुरीकडे ‘नीलकमल’ ही प्रवासी बोट निघाली होती. या बोटीत 100 पेक्षा अधिक प्रवासी होते, ज्यामध्ये 20 लहान मुलांचाही समावेश होता. दुपारी 3.55 वाजता अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने या फेरीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे ‘नीलकमल’ बोट कलंडली आणि बुडू लागली. या भीषण अपघातात 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर किमान 98 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बोटीवरील सुविधांचा अभाव, नीलकमल बोटीचा वेग, बोटीतील क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा.. यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू असताना हा अपघात घडला. नौदलाच्या बोटीवर असलेल्या एका नौसैनिकासह ‘ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर’ (OEM) या कंपनीचे दोन कर्मचारी अपघातात ठार झाल्याची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

बोटीवर सुविधांचा अभाव

नीलकमल या बोटीवरील सुविधांचा अभाव आणि नियमांची पायमल्ली यामुळे अपघातात अधिक जीवितहानी झाल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथून समुद्रमार्गे जहाजाने पर्यटक हे एलिफंटा लेणी तसंच अलिबाग इथं मोठ्या संख्येने जात असतात. मात्र, अनेकदा या बोटी क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जातात. दुर्घटनाग्रस्थ नीलकमल या बोटीबाबतही हेच घडलं. नियमानुसार या बोटीची क्षमता 80 प्रवाशांची असताना त्यावर शंभरपेक्षा अधिक प्रवासी असल्याचं समजतंय. त्याचप्रमाणे नियमानुसार बोटीतील प्रत्येक प्रवाशाला लाईफ जॅकेट मिळणं बंधनकारक आहे. प्रवाशांनी ते प्रवासादरम्यान घालणंही अपेक्षित आहे. मात्र ‘नीलकमल’ बोट बुडताना त्यातील अनेक प्रवाशांना लाईफ जॅकेट्स मिळू शकली नाहीत, अशी माहिती अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी दिली. बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते, मात्र कर्मचारी पाच ते दहाच होते. अपघातानंतर बोटीवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, लाईफ जॅकेट पुरवण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत काय करावं हे सांगण्यासाठी बोटीवर पुरेसं प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हतं. त्यामुळे समुद्रमार्गे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

“प्रवासी बोटीवर योग्य इमर्जन्सीचे प्रोटोकॉल्स नव्हते, बोटीला धडक लागल्यानंतर प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी काय करावं यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी कोणतंही मार्गदर्शन किंवा कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घाबरलेले प्रवासी मिळेल ते लाईफ जॅकेट हातात पकडून ठेवत होते. यापुढे नेमकं काय करायचं, तेच त्यांना समजत नव्हतं. बोटीवर प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती,” असं अपघातातून बचावलेल्या एका प्रवासाने सांगितलं.

बोटीतून प्रवास करणाऱ्या उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथल्या गौतम गुप्ताने या भयानक अनुभवाबद्दल सांगितलं, “बोटीवरील एकाही प्रवाशाला लाईफ जॅकेट दिलं गेलं नव्हतं. स्पीड बोटीच्या घडकेनंतर आम्ही अनेकांना पाण्यातून बाहेर काढलं. जवळपास 20 ते 25 मिनिटांनंतर नौदलाने आमची सुटका केली. परंतु तोपर्यंत आम्ही आमच्या मावशीला गमावलं होतं.” तर आणखी एका प्रवाशाने नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक समुद्रात स्टंट करत होता, असा आरोप केला आहे. “नौदलाची स्पीड बोट स्टंट करत होती. आम्हाला संशय आल्याने मी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्याच्या काही क्षणांतच आमच्या फेरीला त्या बोटीने जोरदार धडक दिली”, असं दुसऱ्या पीडिताने सांगितलं.

नियमांची पायमल्ली

घटनेच्या वेळी ‘नीलकमल’ फेरीमध्ये लाईफ जॅकेट्सचा मोठा साठा उपलब्ध होता, मात्र बोट बुडू लागेपर्यंत कोणत्याही प्रवाशाने किंवा क्रू मेंबरने ते घातलेलं नव्हतं. या घटनेनंतर एका वरिष्ठ बंदर अधिकाऱ्याने सुरक्षेची अपुरी अंमलबजावणी आणि फेरी ऑपरेटर, नियामक प्राधिकरण यांच्याकडून दक्षतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे. लाईफ जॅकेट्ससह सुज्ज असलेली जेएनपीटी पायलट बोट वेळेवर बचावकार्यासाठी पोहोचल्याने आणखी मोठी जीवितहानी टळली, असं बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी नमूद केलं. “बोटींवर लाईफ जॅकेट्स ठेवणं बंधनकारक असताना आपत्कालीन परिस्थितीचा सामना केल्याशिवाय प्रवासी क्वचितच ते परिधान करतात. ही सामान्य आळस घातक ठरू शकते”, असं बंदर अधिकारी म्हणाले.

‘फेरींना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट्स पुरवल्या आहेत का आणि प्रवासादरम्यान त्यांनी ते वापरलेत का, याची खात्री करावी. त्यात अयशस्वी ठरलेल्या फेरी ऑपरेटरना दंड ठोठावला पाहिजे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत’, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

स्थानिक बोट ऑपरेटर सुभाष मोरे यांनी आरोप केला की नौदलाच्या बोटी वारंवार धोकादायकपणे फेरीच्या जवळून चालतात. नौदल अधिकाऱ्यांकडे याबाबत केलेल्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. नौदलाच्या बोटींनी फेरीपासून सुरक्षित अंतर राखण्याची विनंती सातत्याने करण्यात येत होती, मात्र त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप मोरेंनी केला आहे. तर दुसरीकडे ‘नीलकमल’ या प्रवासी बोटीचा चालक फारच वेगाने बोट चालवत होता, असं बंगळुरूहून मुंबईला फिरण्यासाठी आलेल्या राम मिलन सिंह आणि किरण एल. ई. यांनी सांगितलं.

कारवाई

‘नीलकमल’ ही फेरी महेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मालकीची होती. तर पडते कुटुंबीयांकडून ती ऑपरेट करण्यात येत होती. यातील एक मालक सुनील पडते यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. तर अपघातातून वाचलेल्या नथाराम चौधरी यांनी स्पीड बोटच्या क्रूविरोधात औपचारिक तक्रार दाखल केली आबे. निष्काळजीपणा आणि प्रवाशांचा जीव धोक्यात आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांपैकी एक किंवा इतर चार प्रवाशांपैकी एक स्पीड बोटीचं नियंत्रण करत होते की नाही हे अद्याप त्यांना माहिती नसलं तरी या घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी मंडळाची स्थापना केली जाईल. याविषयी अधिकारी पुढे म्हणाले, “जेव्हा जेव्हा एखादा प्रमुख घटक, उदाहरणार्थ इंजिन, एखाद्या क्राफ्टमध्ये बसवला जातो, तेव्हा गंभीर दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही ‘ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफ्रॅक्चरर’ (OEM) सोबत विस्तृत चाचण्या करतो. समजा जर बोटीच्या निर्मात्याने दावा केला की इंजिन 140 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते, तर त्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्याची ऑनबोर्ड चाचणी करतो. अशाच प्रकारची या स्पीड बोटची चाचणी घेतली जात होती.”

स्पीड बोटीमध्ये नवीन इंजिन बसवल्यानंतर चार OEM प्रतिनिधींसह सहा जणांनी त्याची चाचणी सुरू केली होती. तेव्हाच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नील कमल या प्रवासी फेरीशी टक्कर झाली. याप्रकरणी नौदलाच्या बोट चालकासह स्पीड बोटीतील प्रवाशांविरुद्ध एफआयआर नोंदवल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. या घटनेच्या काही मिनिटांनंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ शूट करणाऱ्या नथाराम चौधरी यांनीच पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

स्पीड बोटीमध्ये दोन नौदल अधिकारी आणि चार OEM प्रतिनिधी होते, जे नवीन इंजिनची चाचणी घेत होते, असा दावा नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेत भारतीय नौदलाचे महेंद्रसिंह शेखावत आणि दोन OEM प्रतिनिधी- प्रवीण शर्मा आणि मंगेश यांचा मृत्यू झाला. स्पीड बोटीमधील चाचणीचा भाग असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे आणि इतर दोन जणांवर उपचार सुरू आहेत.

तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या समन्वयाने नौदलाने घटनेनंतर तात्काळ शोध आणि बचावकार्य सुरू केलं. बचाव कार्यात चार नौदल हेलिकॉप्टर, 11 नौदल क्राफ्ट, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलीस बोटींचा समावेश होता. या दुर्घटनेमागील नेमकं कारण समजून घेण्यासाठी चौकशी मंडळाचं आयोजन केलं जाईल. इंजिन कसं बिघडलं ते आम्ही तपासू आणि या दुर्घटनेला इतर काही घटक कारणीभूत आहेत का ते ठरवू, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.