आई आणि मावशीसह पोटमाळ्यावर झोपला होता चिमुकला, अचानक माळा कोसळला अन्…
पावसाने शहरात थैमान घातले आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन पोटमाळ्यावर झोपली होती. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं.
मुंबई : बोरीवलीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पोटमाळा कोसळल्याने एका दीड महिन्याच्या बाळाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना बोरीवलीतील गणपत पाटील नगरमध्ये घडली. जखमी अवस्थेत बाळाला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलाची आई आणि मावशी जखमी झाल्या आहेत. सध्या एमएचबी पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पाल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही बालकाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
पोटमाळ्यावर आईच्या कुशीत झोपले होते बाळ
बोरिवली पश्चिम गणपत पाटील नगर गल्ली क्रमांक 13 मध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे पाल कुटुंबातील महिला आपल्या दीड महिन्यांचे बाळ आणि बहिणीसोबत घरातील पोटमाळ्यावर झोपली होती. मात्र पोटमाळा लाकडाचा आणि खूप जुना असल्याने जीर्ण झाला होता. यामुळे पोटमाळा तिघांच्या वजनाने खाली कोसळला.
रुग्णालयात उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू
पोटमाळ्यावर झोपलेले मायलेक आणि मावशी तिघेही जमिनीवर कोसळले. यात तिघेही जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दीड महिन्याच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बोरीवली एमएचबी पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
भायखळ्यात झाड कोसळून तरुणाचा मृत्यू
भायखळा येथील इंदू ऑइल मिल कंपाउंडमध्ये काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका घरावर भलं मोठं वडाचं झाड कोसळलं. या दुर्दैवी दुर्घटनेत एका 22 वर्षच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन व्यक्ती हे जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ दाखल होत झाड कापून अडकलेल्या दोन व्यक्तींना रेस्क्यू केलं.