काल राष्ट्रवादीच्या 8 आमदारांना नोटीस; आज राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना, आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग
Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekr Going to Delhi : सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्याच्या डेडलाईनसाठी अवघे काही तास राहिलेले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी या दौऱ्याचं कारण त्यांनी सांगितलं.
मुंबई | 29 ऑक्टोबर 2023 : आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचा चेंडू हा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आहे. अशात या सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत. उद्यापर्यंत (30 ऑक्टोबर) हे नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायलयाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्लीला रवाना होण्याआधी राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाधिवक्ता तुषार मेहता यांची राहुल नार्वेवर भेट घेणार आहेत. मी दिल्लीला चाललो आहे. पूर्वनियोजित हा दौरा आहे. त्यासाठी मी चाललो आहे. महाधिवक्त्यांचीही मी भेट घेणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन मी निर्णय घेईल, असं राहुल नार्वेकर म्हणालेत. राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस देण्यात आली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर ही नोटीस जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे, असं नार्वेकर म्हणालेत.
वेळापत्रक सादर करण्यासाठी एक दिवसाचा वेळ
शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा चेंडू आता विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात आहे. याआधी 17 ऑक्टोबरला आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं होतं. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची शेवटची संधी असेल. हवं तर दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी बसून विधानसभा अध्यक्षांसोबत सुनावणीचं वेळापत्रक ठरवावं, अशा सूचना न्यायालयाने दिल्या. त्यानंतर आता उद्या याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाने कठोर शब्दात सुनावल्यानंतर आता उद्या हे वेळापत्रक सादर केलं जाणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
कालच राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना अपात्रता प्रकरणी नोटीस देण्यात आली. त्यानंतर आज राहुल नार्वेकर हे दिल्लीला जात आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी त्यांचा हा दौरा महत्वाचा आहे.