मोठा ट्विस्ट! मिहीर शाह याच्या आई आणि बहिणीलाही अटक, त्यादिवशी वांद्र्याच्या कलानगरातूनच….
मिहीर शाह याच्या आई आणि बहिणीला अटक केल्यानंतर आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. अपघातानंतर मिहीरने आपली अपघातग्रस्त कार मुंबईच्या वांद्रे येथील कलानगरात पार्क केली होती. त्याने फोनवर आपल्या वडिलांशी बातचित केली होती. यानंतर त्याने फोन बंद केला होता. तसेच कलानगर येथे गाडी सोडून तो पळून गेला होता.
वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट येताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला अटक केली आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मिहीर शाह याची आई आणि बहिणीलादेखील अटक केली आहे. मिहीरची आई आणि बहीण घटनेनंतर घराला कुलूप लावून गायब झाले होते. पोलिसांनी मिहिरचे वडील राजेश शाह यांना ताब्यात घेतलं होतं. राजेश शाह यांना आज कोर्टाकडून जामीनही मंजूर झाला. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांना मिहीर शाह याला अटक करण्यात यश आलं. मिहीर याला मुंबईतूनच अटक करण्यात आली आहे. तर त्याला पळून जाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या माध्यमातून मदत करणाऱ्या 12 जणांना पोलिसांना अटक केली आहे. यामध्ये मिहीरची आई आणि दोन्ही बहिणींचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर परिसरातील डोलखांब बंजारा हिल परिसरातून मुंबई क्राईम ब्रँच युनिटने 5 जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये मिहीर शाह याची आई आणि दोन बहिणींचा समावेश आहे. तसेच मिहीरचा एक मित्र आणि रिसॉर्टच्या मालकाचा देखील समावेश आहे. मिहीरची आई मिनी राजेश शाह (वय 50), मिहीरची मोठी बहीण पूजा राजेश शहा (वय 32), दुसरी बहीण किंजल राजेश शहा (वय 27) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. तसेच अवादित सिंग तेजसिंग (वय 23), हसन अब्दुल वहीत खान (वय 19) या दोघांनादेखील डोलखांब बंजारा हिल परिसरातून अटक करण्यात आली. मुंबई क्राईम ब्रँच युनिटने या पाचही जणांची नोंद किनवली पोलीस स्थानकात देत मुंबई आणले असल्याची माहिती आहे.
मिहीरच्या वडिलांना जामीन, पण आई आणि बहिणींना अटक
मिहीर शाह याच्या आई आणि बहिणीला अटक केल्यानंतर आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. अपघातानंतर मिहीरने आपली अपघातग्रस्त कार मुंबईच्या वांद्रे येथील कलानगरात पार्क केली होती. त्याने फोनवर आपल्या वडिलांशी बातचित केली होती. यानंतर त्याने फोन बंद केला होता. तसेच कलानगर येथे गाडी सोडून तो पळून गेला होता. विशेष म्हणजे मिहीरची आई आणि बहिणीदेखील घराला कुलूप लावून बेपत्ता झाल्या होत्या. फक्त मिहीरचे वडील राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनादेखील आता जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मिहीरच्या मेडिकल चाचणीत पोलिसांना पुरावा मिळणार का?
मिहीरला अटक केल्यानंतर आता त्याची मेडिकल चाचणी केली जाणार आहे. पण घटनेला आता 48 तासांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. मिहीरने वरळीत दाम्पत्याला धडक देण्यापूर्वी एका बारमध्ये पार्टी केल्याची माहिती समोर आली होती. संबंधित बारचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्याने ड्रग्जचं सेवन केलं होतं का? याबाबतची अद्याप माहिती समजू शकलेली नाही. त्याच्या मेडिकल चाचणीतून याबाबतची माहिती समोर येऊ शकली असती. पण आता घटनेला 48 तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यामुळे त्याच्या मेडिकल चाचणीतून कोणतीही माहिती मिळणं तसं कठीण आहे. त्यामुळे पोलिसांना ड्रग्ज किंवा मद्यपान घेतल्याच्या आरोपांप्रकरणी ठोस मेडिकल रिपोर्टचा पुरावा मिळतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.