गोविंद ठाकूर, मुंबई : मुंबई पोलिसांच्या नावाखाली ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढते आहेत. चीनमध्ये बसून लोकांची बँक खाती रिकामी करणारी टोळी पोलिसांनी शोधली आहे. या टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्यांवर विविध शहरांमध्ये गुन्हे दाखल आहे. परंतु टोळीचा मास्टरमाइंट चीनमध्ये बसला असून तेथून तो सूत्र हलवत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केंद्र सरकारची मदत घ्यावी लागणार आहे.
मुंबई पोलिसांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील पाच जणांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचे मास्टरमाइंड चीनमध्ये बसून भारतातील विविध राज्यात ऑनलाइन फसवणूक करत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीतील लोक व्हॉट्सअॅप आणि स्काईप अॅपच्या माध्यमातून बहुतांश महिलांना टार्गेट करायचे.
अटक करण्यात आलेले आरोपी स्वतःला मुंबई पोलिसांचे अधिकारी सांगत होते. त्यासाठी त्यांनी डुप्लिकेट पोलीस ओळखपत्र तयार केले होते. अनेक वेळा पोलिसांचा युनिफॉर्म घालून व्हिडिओ कॉलवर ते बोलत होते.
लोकांना फोन करून तुमच्या नावाच्या कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडले आहेत, असे सांगत होते. मग कारवाईच्या नावाखाली धमकावून त्यांचे बँक खाते व इतर तपशील घेऊन ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करत होते. बँकेचा तपशील मिळाल्यावर ५ मिनिटांत संपूर्ण बँक खाते रिकामा केले जात होता. जे काही पैसे ट्रान्सफर करायचे ते मुख्य आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात जात होते.
कोठून केली अटक
मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, या आरोपींना कोलकाता, मुंबई आणि विशाखापट्टणम येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हैदराबाद, सायबराबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि इतर अनेक शहरांमध्ये अशा ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
कोण आहेत आरोपी
सुमारे दीड महिन्याच्या अथक परिश्रमानंतर या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात संजय नीळकंठ मंडळ, अनिमेश अजितकुमार वैद्य, महेंद्र अशोक रोकडे, मुकेश अशोक दिवे यांचा समावेश आहे. मुख्य आरोपीचे नाव आहे श्रीनिवास राव सुब्बाराव दाडी (वय 49 वर्षे) आहे. तो हैदराबाद, तेलंगणाचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला विशाखापट्टणम येथील नोव्होटेल हॉटेलमधून अटक केली.
चीनचे काय आहे कनेक्शन
पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपीने सांगितले की, त्यांचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसला आहे. त्याच्या इशाऱ्यावर लोक भारतातील विविध राज्यांमध्ये पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने ऑनलाइन फसवणूक करतात.
यात मुख्य आरोपी श्रीनिवास सुब्बाराव दाडी याचा अल्पवयीन मुलगाही आहे, मात्र तो सध्या चीनमध्ये आहे.
पोलिसांनी काय केले जप्त
पोलिसांनी आरोपींकडून पॅनकार्ड, डेव्हिड कार्ड, ओळखपत्र, बँक पासबुक, लॅपटॉप, मोबाईल फोन, स्टॅम्प रबर असे अनेक साहित्य जप्त केले आहे. सध्या बांगूर नगर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचाही शोध घेत आहेत.