मुंबई: भाजपच्या (bjp) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा या गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांना नोटिस बजावण्यासाठी एक टीम पाठवली होती. पण गेल्या चार दिवसांपासून त्या घरात नसल्याने पोलीस त्यांना नोटिस देऊ शकले नाहीत. 11 जून रोजी नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना पायधुनी पोलिसांनी 25 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या हजर राहू शकल्या नाहीत. नुपूर शर्मा चार दिवसांपासून गायब आहेत. त्या घरी नाहीत, असा दावा पोलिसांनी केला आहे. एका टीव्हीवरील चर्चेत नुपूर शर्मा यांनी पैगंबरांबाबत (Prophet Row) आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यामुळे देशभर गदारोळ उठला होता. महाराष्ट्रासह अनेक राज्यात या प्रकरणी जोरदार निदर्शने झाली होती. जगातील मुस्लिम राष्ट्रांनीही या विधानावर तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शर्मा यांच्या विरोधात पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘द हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. नुपूर शर्मा यांना नोटिस देण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून पोलिसांची टीम जात आहे. पण शर्मा यांचा तपास लागत नाहीत. त्या गायब आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. रजा अकादमीच्या मुंबई विंगचे संयुक्त सचिव इरफान शेख यांच्या तक्रारीनंतर पायधुनी पोलीस ठाण्यात शर्मा यांच्या विरोधात 29 मे रोजी तक्रार दाखल केली होती. धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तेढ वाढवणे आदी आरोपांखाली त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शर्मा यांच्या निषेधार्थ झारखंडची राजधानी रांचीमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यात दोन लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. हिंसेवेळी अनेक वाहनांचं नुकसान झालं. महाराष्ट्रातही अनेक पोलीस ठाण्यात शर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आील आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. मात्र, चार दिवसांपासून शर्मा यांचा शोध लागत नाहीये.
पैगंबरांबाबत आक्षेपहार्य विधान केल्याबद्दल नुपूर शर्मा आणि दिल्लीतील मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं आहे. या दोन्ही नेत्यांनी विधान केल्याच्या पाच दिवसानंतर देशभरात हिंसक पडसाद उमटले. शर्मा यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आंदोलक करत होते. बघता बघता आंदोलक हिंसक झाले. हिंसा आणि जाळपोळ करण्यात आली. देशातील अनेक राज्यात नुपूर शर्मा यांचा विरोध केला जात आहे.