ठाकरे गटाच्या आणखी एका बड्या नेत्याला समन्स, अनिल देसाई यांच्या अडचणी वाढणार?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे.
कृष्णा सोनारवाडकर, Tv प्रतिनिधी | 2 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना घोषित केल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून पक्ष निधीमधून 50 कोटी रुपये काढण्यात आले. त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी EOWकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता अनिल देसाई यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. अनिस देसाई यांना येत्या 5 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. अनिल देसाई चौकशीला सामोरं जातात का, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महत्त्वाच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. शिवसेना पक्षाचा निधी ठाकरे गटाकडून वापरला जात आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली जात आहे.
आयकर विभागाकडून यापूर्वी शिवसेना पक्षाच्या निधीच्या अकाउंटची माहिती मागवली होती. त्यानंतर आता पुढील चौकशीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांना चौकशीला बोलावण्यात आलं आहे. त्यांना 5 मार्चला चौकशीला हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. अनिल देसाई हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनीच शिंदे गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणी गुन्हा दाखल करतं का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांचा याच मुद्द्यावरुन विधानसभेत निशाणा
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत याबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. “आम्हाला खोके खोके म्हणणारे, त्यांनी आमच्याच खात्यातून 50 कोटी घेतले आहेत. त्याची आता चौकशी सुरु आहे. शिवसेनेच्या खात्यातले 50 कोटी घेतले”, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “शिवसेना अधिकृतपणे आमच्याकडे आहे, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. खोके पुरत नाही म्हणून…”, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती.