मुंबई: आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या (neil somaiya) यांच्या घरी पोलिसांनी धडकर दिली आहे. दोन्ही पितापुत्रांच्या घरावर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटिशीत किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना येत्या 13 तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या यांना या आधीही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ते आले नव्हते. त्यामुळे त्यांना स्मरण देणारी ही नोटीस त्यांच्या घरावर लावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी (mumbai police) ही नोटीस लावली आहे. मात्र, सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव घरी नाहीत. त्यामुळे आता सोमय्या या नोटिशीला काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस आज दुपारी अचानक सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या यांच्या घरी आले. त्यांनी नील यांच्या घराची बेल वाजवली. पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या दारावर नोटीस लावली आहे. सहा ते सात पोलीस नील सोमय्या यांच्या घरी आले होते. काही पोलीस साध्या वेशात होते तर काहींनी वर्दी परिधान केलेली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलुंडच्या निलम नगरमधील सोमय्या यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. तिथेही सोमय्या यांच्या घरातून काहीच प्रतिसाद न आल्याने पोलिसांनी सोमय्या यांच्या घरावर नोटीस लावली.
त्यानंतर पोलिसांनी सोमय्या यांच्या निलम नगरातील कार्यालयात जाऊन काही कागदपत्रांची तपासणी केली. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सोमय्या कुठे आहेत याबाबत विचारणा केली. सोमय्या यांना आम्ही हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यांना 13 तारखेपर्यंत हजर राहायचे आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांच्या घरी जाऊन पोलिसांनी नोटीस लावली. सोमय्या घरी नव्हते. सोमय्या काही दिवसांपासून गायब आहेत. ते पोलिसांना सापडत नाहीत. मात्र, सोमय्या यांचा आज सकाळी व्हिडीओ आला आहे. त्यात त्यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे सोमय्या हे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच पोलिसांच्या समोर येतील असं सांगितलं जात आहे. सोमय्या यांना केंद्राची सुरक्षा असतानाही ते पोलिसांना सापडत का नाहीत? असा सवालही केला जात आहे.
संबंधित बातम्या:
Maharashtra News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेची टीम किरीट सोमय्यांच्या घरी दाखल
Raut on Somaiya: इथे धमकी द्यायची, थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे; राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप