मुंबईत मोठा हंगामा! काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं भोवलं, पोलिसांनी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना चोप चोप चोपलं
मुंबईत मोठा हंगामा झाला आहे. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरुन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चोप चोप चोपलं.
विधिमंडळाचं नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात नक्षलवाद, ईव्हीएम अशा विविध मुद्द्यांवरुन विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं. तर दुसरीकडे मुंबईत आज मोठा राडा झालेला बघायला मिळतोय. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात शिरुन तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चोप चोप चोपलं. या घटेनमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी चुप्या पद्धतीने हे आंदोलन केलं, असा आरोप केला जातोय. तर काँग्रेसकडून या आंदोलनावर टीका केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला. परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांनी काँग्रेस कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर गोष्टींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आंदोलकांजवळ असलेल्या फलकावर काँग्रेस संविधानाचा अपमान करत असल्याचं म्हणण्यात आलं होतं. यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी कार्यालायचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना यावेळी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आंदोलकांना एवढं धुतलं की अक्षरश: आंदोलकांना रस्त्यावर खाली पाडून लाठीचार्ज केला.
नेमकं काय घडलं? आंखों देखा हाल
दरम्यान, आम्ही आंदोलकांचं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलकांनी काँग्रेस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असल्याचा आरोप केला. यानंतर आम्ही आंदोलन झालं त्यावेळी काँग्रेस कार्यालयात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला. “सुरुवातीला घोषणाबाजीचा आवाज आला तेव्हा आम्हाला वाटलं की, सर्वसामान्य मोर्चा असेल. पण नंतर आम्हाला जोरजोरात लाथाबुक्यांचा आवाज ऐकू आला. त्यामुळे आम्ही दरवाजा बंद केला. आम्ही सावधानता बाळगल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळी आम्ही सर्वजण दरवाजा बंद करुन केबिनमध्ये लपून बसलो होतो”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी दिली.