दोन चिमुरडे लाटांमध्ये अडकले, ते समुद्राच्या पोटात जाऊ लागले तेवढ्यात….
मुंबईत आलेल्या पहिल्या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. पण पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. विशेष म्हणजे आज जुहू चौपाटीवर एका पोलीस कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांचा जीव वाचवला आहे.

मुंबई : राज्यात आज सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत आलेल्या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. पण पहिल्याच पावसाने मुंबईची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. मुंबईकरांसाठी आजचा पहिल्या पावसाचा दिवस खरंच अनपेक्षित असा ठरला आहे. अंधेरीत पाणी साचल्यामुळे वाहनांना रस्सीने खेचण्याची नामुष्की ओढावली. इथे एका महिलेला वाहून जाण्यासापासून नागरिकांनी वाचवलं. तर गोवंडीत पावसाआधी नालेसफाईसाठी गेल्या दोन मजुरांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या घटनेत समुद्रात वाहून जाणाऱ्या दोन चिमुकल्यांना वाचवण्यात पोलीस कर्मचाऱ्याला यश आलं आहे.
मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर अकाउंटवर पोलीस कर्मचारी दोन चिमुकल्यांना वाचवण्याचा व्हिडीओ ट्विट करत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “सांताक्रुझ पोलीस ठाणे हद्दीतील जुहू चौपाटी येथे दोन लहान मुले समुद्रात खोल बुडत असल्याचे लक्षात येताच तेथे कर्तव्य बजावणारे पोलीस शिपाई बेले यांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन त्या दोन चिमुरड्यांचा जीव वाचवला. प्रथमोपचार करुन पालकांकडे सुखरुप सोपवण्यात आले”, असं मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवर सांगण्यात आलं आहे.
स्वतःच्या प्राणाची बाजी लावत वाचवला दोन चिमुरड्यांचा जीव.
सांताक्रुझ पोलीस ठाणे हद्दीतील जुहू चौपाटी येथे दोन लहान मुले समुद्रात खोल बुडत असल्याचे लक्षात येताच तेथे कर्तव्य बजावणारे पो.शि. श्री बेले यांनी आपल्या प्राणाची बाजी लाऊन त्या दोन चिमुरड्यांचा जीव वाचवला. प्रथमोपचार… pic.twitter.com/6OugaKfWbF
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) June 24, 2023
गोवंडीत साफसफाई करताना दोघांचा मृत्यू
दरम्यान, गोवंडीतून एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. गोवंडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ता क्रमांक 10 वरील गटाराच्या सफाई कामगाराचा मृत्यू झाल्याची बातमी पसरल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच ठिकाणी बीएमसीचे पोलीस अधिकारी पोहोचले आणि त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवर लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस आहे, त्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला. सध्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर समजेल. पण परिसरात गोंधळाचे वातावरण होते. 90 फूट रस्त्यावर वाहतूकही ठप्प झाली होती.