मुंबई : गेल्या काही दिवसापासून ईडीने मुंबईत छापेमारी सुरू केली आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ही छापेमारी सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी आणि काही राजकीय नेते ईडीच्या रडारवर आले आहेत. काही जणांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांना समन्सही बजावलेलं आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ईडीने ही कारवाई केल्याने ठाकरे गटाचे धाबे दणाणले आहेत. हे धाडसत्र चालू असतानाच महापालिकेतील कोट्यवधीच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
भाजप नेते, आमदार अमित साटम यांनी कॅगचा अहवाल आल्यानंतर महापालिकेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश केला होता. महापालिकेत 12 हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप साटम यांनी केला होता. साटम यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी महापालिकेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. फणसाळकर यांच्या नेतृत्वात ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. फणसाळकर यांच्या नेतृत्वातील एक पथक महापालिकेतील या गैरव्यवहाराची चौकशी करणार आहे. कॅगचा अहवाल तपासून या व्यवहाराची चौकशी करणार आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली आहे. त्यामुळे एसआयटीच्या रडारवर कोण येणार? असा सवाल केला जात आहे. एसआयटीच्या रडारवर महापालिकेचे अधिकारी येणार की राजकारणी येणार? असा सवाल करण्यात येत आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतील व्यवहारांची एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याने ठाकरे गटाचे धाबे दणाणले असल्याचं सांगितलं जात आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार हा ठाकरे गटासाठी निवडणुकीत डोकेदुखी ठरू शकतो, असंही सांगितलं जात आहे.