मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडची हवा बिघडली; ‘या’ फटाक्यांमुळे वाढले प्रदूषण
देशभरात काल दिवाळी जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने देशभर प्रचंड आवाजाचे फटाके फोडण्यात आले. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे या तिन्ही शहरातील हवा बिघडली आहे. तिन्ही शहरातील हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषण न करणारे फटाके फोडण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.
निवृत्ती बाबर, रणजीत जाधव, कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई / पुणे | 13 नोव्हेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून मुंबईची हवा अत्यंत खराब झाली आहे. मुंबईत प्रचंड प्रमाणात प्रदूषण झालं होतं. मुंबईसह पिंपरी चिंचवड आणि राज्यातही अनेक ठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढली होती. उल्हासनगरमध्ये तर सर्वात घातक प्रदूषण होतं. पण दोन दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने मुंबईचं प्रदूषण काहीसं कमी झालं. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, दिवाळी निमित्त राज्यभर फटाक्यांची आतषबाजी झाली. मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात फटक्यांची आतषबाजी झाली. त्यामुळे या दोन्ही शहराचं प्रदूषण वाढलं आहे. मुंबईत तर प्रदूषणात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता आधीच घसरलेली असताना फटाके फोडण्यासाठी हायकोर्टाने दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केलं जातंय. फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईत आणखी मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढताना पाहायला मिळतय. मुंबईतल्या अनेक मोठ्या इमारती या धुक्यामुळे स्पष्ट दिसत नाहीयेत. मरीन ड्राईव्हसह मुंबईच्या अनेक भागात दाट धुकं दाटलं होतं. त्यामुळे इमारती दिसत नव्हत्या.
कोर्टाचे आदेश धाब्यावर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करून देखील मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे प्रदूषणामध्ये आणखी वाढ झाल्याचे चित्र सध्या मुंबईमध्ये दिसून येत आहे. मुंबईची हवेची गुणवत्ता अधिक खालावली आहे. तर दुसरीकडे कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले आहेत. यामुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे. तसेच हवेची गुणवत्ताही ढासळली आहे. प्रदूषणामुळे पर्टीक्युलेट मॅटर PM 2.5 वर पोहोचला आहे. सल्फर डायॉक्साईडची लेव्हल 4 वर गेली आहे, जी 2 पर्यंत असायला हवी.
असं आहे प्रदूषण
मुंबई- 234 AQI
भांडूप – 147 AQI
कुलाबा – 173 AQI
मालाड – 309 AQI
माझगाव – 267 AQI
वरळी – 134 AQI
बोरिवली – 307 AQI
बीकेसी – 312 AQI
चेंबूर – 337 AQI
अंधेरी – 174 AQI
नवी मुंबई – 184 AQI
हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
0 ते 50 एक्यूआय – उत्तम 50 ते 100 एक्यूआय – समाधानकारक 101 ते 200 एक्यूआय – मध्यम 201 ते 300 एक्यूआय – खराब 301 ते 400 एक्यूआय – अतिशय खराब 401 ते 500 एक्यूआय – गंभीर
पिंपरी चिंचवडची हवा काय म्हणते?
उत्तम पर्यावरण आणि निरोगी वातावरणामुळे लोकप्रिय ठरलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे. वाढते शहरीकरण, वाहनांचा धूर, औद्योगिक विस्तार, बांधकाम प्रकल्पांमुळे दर वर्षी पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. त्यातच दिवाळीच्या फटाक्यांची भर पडल्याने नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक असल्याचा अहवाल अनेक खासगी संस्थामार्फत नोंदविण्यात आला आहे. फटाक्यांमुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील हवामानाची पातळी खालावली असून शहरात विविध ठिकाणी धुरांचे लोट दिसत होते.
या फटाक्यांमुळे प्रदूषण वाढले
लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी पिंपरी चिंचवड शहरातील भूमकर चौक, निगडी, भोसरी याठिकाणचा हवेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला. आकाशात फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळाले. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवा प्रदूषण वाढले आहे.
‘सफर’ने नोंदवलेला हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक
( काल रात्री साडेनऊपर्यंत)
निगडी : 252 AQI (वाईट)
भूमकर चौक : 226 AQI (वाईट)
भोसरी :197 AQI (वाईट)
आळंदी :135 AQI (मध्यम)