Mumbai Pune High speed Railway : मुंबई-पुणे अंतर आता केवळ अडीच तासांवर! ‘वंदे भारत’ अंतर्गत सेमी हायस्पीड ट्रेनला परवानगी
मुंबई-पुणे मार्गावर ही सेमी हायस्पीड रेल्वे धावणार असून, त्यामुळे मुंबई-पुणे अंतर आता केवळ अडीच तासात कापता येणार आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून ही रेल्वेसेवा सुरु करण्याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबई, पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राला पहिली वंदे भारत (Vande Bharat) सेमी हायस्पीड रेल्वे मिळणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर (Mumbai Pune Railway Track) ही सेमी हायस्पीड रेल्वे धावणार असून, त्यामुळे मुंबई-पुणे अंतर आता केवळ अडीच तासात कापता येणार आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून ही रेल्वेसेवा सुरु करण्याबाबत अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या स्वातंत्र्यदिनापासून म्हणजे 15 ऑगस्टपासून ही सेवा सुरु होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitaraman) यांनी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना 400 वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केली होती. त्यानुसार आता मुंबई-पुणे मार्गावर दोन सेमी हायस्पीड रेल्वे मिळणार असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई-पुणे मार्गावर सध्या डेक्कन क्वीन ही सर्वात जलद एक्सप्रेस आहे. या गाडीला दोन्ही शहरातील अंतर कापण्यासाठी 3 तास 10 मिनिटे वेळ लागतो. मात्र, वंदे भारत अंतर्गत मिळणाऱ्या सेमी हायस्पीड ट्रेन हे अंतर अवघ्या अडीच तासात पार करु शकतात. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नोकरदारांसाठी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठीही ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. दरम्यान, या रेल्वेचे तिकीट दर काय असतील याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
‘डेक्कन क्वीन’ला झाली 92 वर्षे पूर्ण
पुणे-मुंबई प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन 92 वर्षांची झाली आहे. 1 जून रोजी डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापण्यात आला. इंजिनाचं पूजनही करण्यात आलं. तसंच चालकांचा सत्कारदेखील करण्यात आला. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक एस. सी. जैन यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी यावेळी उपस्थित होते. 1 जून 1930 रोजी महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ची सुरुवात हा मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील 2 महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते. या रेल्वेला ‘दख्खनची राणी’ असंही म्हटलं जातं.
मराठवाड्यातही वंदे भारत हायस्पीड रेल्वे?
मराठवाड्यातील जालना-मनमाड आणि जालना-नांदेड या दोन लोह मार्गांच्या विद्युतीकरणाला हिरवा झेंडा मिळाला आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक दिवसांपासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यासाठी प्रयत्नशील होते. अखेर या योजनेला हिरवा झेंडा मिळाल्याची माहिती त्यांनी फेब्रुवारीत दिली होती. केंद्र सरकारच्या वंदे भारत या रेल्वे योजनेअंतर्गत रेल्वे मराठवाड्यातूनही धावली पाहिजे, अशी दानवे यांची महत्त्वाकांक्षा आहे. या मार्गांचे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत रेल्वे मराठवाड्यातील दोन स्थानकांदरम्यान धावू शकेल. यामुळे येथील प्रवाशांची सोय होईल आणि औद्योगिक विकासास चालना मिळेल, असं दानवे म्हणाले होते.
वंदे भारत योजनेचा मराठवाड्याला काय फायदा?
‘वंदे भारत’ ही सेमी हायस्पीड रेल्वे आहे. अशा प्रकारची रेल्वे प्रामुख्याने दोन शहरांमध्ये दिली जाते. तसंच ताशी 130 ते 180 किलो मीटर एवढा वेग असतो. सध्या देशातील काही प्रमुख शहरांमध्येच ही रेल्वे उपलब्ध आहे. जालना ते मनमाड आणि जालना ते नांदेड या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यावर येथील रेल्वेचा वेग ताशी 120 ते 130 किमी असेल. तसेच या मार्गावर नव्या रेल्वे सुरु करता येतील. यात प्रामुख्याने इंटरसिटी ट्रेनचा समावेश असेल.