Mumbai Rain : मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न हलका; मोडक-सागर पाठोपाठ तानसा तलावही ओसंडून वाहू लागला
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 2 तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
मुंबई : महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव (Tansa Lake) आज (14 जुलै 2022) रात्री 8.50 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण 38 दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री 9.50 पर्यंत 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. काल (13 जुलै 2022) मोडक सागर (Modak Sagar) जलाशय ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. म्हणजेच, यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 2 तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
तानसा तलावाचा विचार करता, मागील वर्षी दिनांक 22 जुलै 2021 रोजी पहाटे 5.48 वाजता तर त्याआधीच्या वर्षी दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.05 वाजता पूर्ण भरुन हा तलाव वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. पैकी, तानसा तलावाची जलधारण क्षमता सुमारे 1 लाख 45 हजार 80 दशलक्ष लीटर इतकी आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १४,४७,३६३ दशलक्ष लीटर इतकी आहे. पैकी, तानसा तलावाची क्षमता १ लाख ४५ हजार ०८० दशलक्ष लीटर इतकी आहे. गतवर्षी दिनांक २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता हा तलाव भरुन वाहू लागला होता. #MyBMCUpdates pic.twitter.com/xX9xoCPVsa
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2022
एक दिवस आधी मोडक सागरही भरुन वाहिला
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज 385 कोटी लीटर (3850 दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या 7 तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा बुधवारी दुपारी 1.4 मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकीमोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला असल्याची माहिती माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.
मोडक-सागर तलाव गेल्यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये 22 जुलै रोजी मध्यरात्री 3.24 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्यापूर्वी 2020 मध्ये 18 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता, 2019 मध्ये 26 जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन 2018 व 2017 अशा दोन्ही वर्षी हा तलाव 15 जुलै रोजी आणि 2016 मध्ये 1 ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.
#WATCH | Modak-Sagar lake, which supplies drinking water to residents of Mumbai, starts overflowing following heavy rainfall in the city
(Source: BMC) pic.twitter.com/bzYtGmXKTZ
— ANI (@ANI) July 13, 2022
7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी असून यामध्ये आज पहाटे 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार 81152.20 कोटी लीटर (8,11,522 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 56.7 टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. याबाबत तलावनिहाय आकडेवारी विचारात घ्यावयाची झाल्यास अप्पर वैतरणा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 43.72 टक्के अर्थात 9926.80 कोटी लीटर (99,268 दशलक्ष लीटर), तानसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 66.79 टक्के अर्थात 9689.40 कोटी लीटर (96,894 दशलक्ष लीटर), ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’मध्ये (मध्य वैतरणा) पाणी साठवण क्षमतेच्या 53.90 टक्के अर्थात 10432.20 कोटी लीटर (1,04,322 दशलक्ष लीटर), भातसा तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 51.6 टक्के अर्थात 36611.30 कोटी लीटर (3,66,113 दशलक्ष लीटर), विहार तलावामध्ये पाणी साठवण क्षमतेच्या 53.18 टक्के अर्थात 1473 कोटी लीटर (14730 दशलक्ष लीटर) आणि तुळशी तलावामध्ये देखील पाणी साठवण क्षमतेच्या 76.8 टक्के अर्थात 612.10 कोटी लीटर (6,121 दशलक्ष लीटर) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.