एकीकडे वाहतूक कोंडी, दुसरीकडे लाईफलाईन कोलमडली, मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा ‘लेट’मार्क
मुंबईची लाईफलाईन कोलमडल्यामुळे कामासाठी निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. तर वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai Rains Update : सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील चर्चेगट, सीएसएमटी, भायखाळा, सायन, माटुंगा, चेंबूर, कुर्ला, दादर या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरातही पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरातही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यातच आता हवामान विभागाने सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकलमुळे मुंबईकरांचा खोळंबा
मुंबईत सुरु असलेल्या जोरदार पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवांवर झाला आहे. मुंबईतील मध्य रेल्वेवरील वाहतूक ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. तर पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूकही कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटे उशिराने धावताना दिसत आहे. त्यासोबतच हार्बर मार्गावरील सर्व लोकल या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईची लाईफलाईन कोलमडल्यामुळे कामासाठी निघालेल्या मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे.
मोठी वाहतूक कोंडी
तर दुसरीकडे आनंद नगर जकात नाका ते मुलुंड टोलनाक्याच्या पुढे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. एकीकडे पडणारा पाऊस, सिग्नल यंत्रणा, टोल नाका आणि रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावलेली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांनाही बसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक कर्मचाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कशाप्रकारच्या उपाययोजना केल्या जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.




कोकणात पावसाचा जोर वाढला
रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढला. किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. परंतु दक्षिण रत्नागिरीत पावसाच्या जोरदार सरी सुरु आहे. किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट
दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २१ जुलैपर्यंत कोकणासह पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्याच्या आंतर भागात, मध्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.