Mumbai Rain : काल मुसळधार आज विश्रांती, मुंबईकरांना दिलासा; लोकलचे अपडेट काय?
मुंबईत आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
Mumbai Rain : मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार सुरु असलेल्या पावसाने अखेर विश्रांती घेतली आहे. यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई उपनगरातही पावसाने विश्रांती घेतल्याने रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. तसेच मुंबईत पावसाचा जोर ओसरल्याने मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेली मुंबई लोकल सेवा सुरळीतपणे सुरु आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि कोकणात रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असल्याने खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत पाऊस ओसरल्यामुळे मध्य रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. ठाणे ते कल्याणच्या दिशेने आणि सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहेत. तसेच ठाणे ते वाशी आणि पनवेलला जाणाऱ्या हार्बर रेल्वेवरील वाहतूकही वेळेनुसार धावत आहेत. तर सीएसएमटीहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल काही मिनिटे उशीराने धावत आहेत. यामुळे आज चाकरमान्यांना वेळेवर कामावर पोहोचता येणार आहे.
पावसाचा जोर ओसरला
मुंबईत काल याच वेळेला पावसाने दाणादाण उडवली होती. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्णपण कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. भांडूपदरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे गाड्या उशिराने धावत होत्या. मात्र आज पावसाचा जोर ओसरला असून चाकरमान्यांना वेळेवर कामावर पोचता येणार आहे
मुंबई उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसानेही विश्रांती घेतली आहे. अंधेरी सबवे, मालाड सबवे आणि मिलन सबवे देखील चालू आहेत. एसव्ही रोड, लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूकही सुरळीतपणे सुरु आहे. त्यासोबतच पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही सुरळीत सुरु आहे. मुंबईत आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर
मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ढगाळ वातावरण कायम
मुंबईतील कल्याण डोंबिवली परिसरात काल संध्याकाळपासून सुरु असलेल्या पावसाने पहाटेपासून विश्रांती घेतली आहे. मात्र अजून ही ढगाळ वातावरण कायम असून दुपारनंतर पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.