Mumbai Rain | मुंबईत मुसळधार पाऊस, ‘हा’ महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद
Mumbai Rain Updates | मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय.
मुंबई | भारतीय हवामान खात्याने मुंबईसह अनेक जिल्ह्यांना आज 27 जुलै रोजी रेड अलर्ट दिला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईत गुरुवार मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय. मुंबईसह मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, अंधेरीला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेत मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय. मुंबई महापालिका प्रशासनाने खबरदारी म्हणून अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे आता नाहक मनस्तापाचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईत जेव्हा जेव्हा पाऊस होतो, तेव्हा अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला जातो. सबवेचा भाग हा सखळ आहे. त्यामुळे त्या भागात थोड्या पावसामुळेही पाणी भरतं. परिणामी वाहतूक बंद करावी लागते. अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या गोखले पूलाचं काम हे सुरु आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व-पश्चिम असा प्रवास करण्यासाठी विलेपार्ले इथील कॅप्टन गोरे उड्डानपूल, मिलन सबवे, तर जोगेश्वरीतील ट्रॉमा सेंटर या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतो. या 3 पर्यायी मार्गांच्या तुलनेत अंधेरी सबवे हा पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतो.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकींची वाहतूक या सबवेतून सुरु असते. मात्र आता अंधेरी सबवे बंद झाल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा नाईलाजाने वापर करावा लागणार आहे.
कल्याण-डोंबिवली धुवाधार पाऊस
दरम्यना कल्याण डोंबिवली इथेही दुपारपासून तुफान पाऊस सुरुय. त्यामुळे डोंबिवली स्टेशनबाहेर गुडघाभर पाणी साचलंय. पावसाचं पाणी हे दुकानात शिरलंय. पावसाच्या पाण्यापासून दुकानातील वस्तूंचं बचाव करताना दुकानदारांची तारांबळ उडालीय.
तर कल्याण रेल्वे स्टेशनवर पावसाचं पाणी साचायला सुरुवात झालीय. या साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ही 20 मिनिटं उशिरा आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक संतापाचा सामना करावा लागतोय.
पुढील 24 तास महत्वाचे
राज्यासाठी पुढील 24 तास हे अतिशय महत्वाचे असे असणार आहे. कारण पुढील 24 तासात मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-साताऱ्यातील घाट परिसरासह कोल्हापुरालाहाी पावासाचा इशारा देण्यात आला आहे.