Mumbai Rains : अंदाज पावसाचा वाटे खरा असावा! रात्रभर संततधार, मुंबईतील सखल भाग जलमय, आज ऑरेंज अलर्ट
Mumbai Rains : आजपासून पुढचे तीन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला येलो तर रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबई : कुलाबा हवामान (Colaba IMD) वेधशाळेनं वर्तवलेला पावसाचा (Mumbai Rain Prediction) अंदाज खरा ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत मुंबई (Mumbai Rains Update) आणि उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाची संततधार मुंबई शहर आणि उपनगर सुरुच आहे. आजपासून पुढचे तीन दिवस मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरत असून मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपास असलेल्या ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
सखल भाग जलमय
मुंबईत रात्रभर झालेल्या पावसाने सखल भाग जलमय झाल्याचं पाहायला मिळालंय. मुंबईत यंदा मुसळधार पावसामुळे दरवर्षी जिथं पाणी साचतं, त्या हिंदमाता भागात यंदा पाणी साचल्याची फारशी नोंद करण्यात आलेली नाही. मात्र मंगळवारी रात्री झालेल्या संततधारेमुळे सायन परिसराचा सखल भाग जलमय झाला होता.
पाहा व्हिडीओ :
रात्रीची वेळ असल्यानं फारशी वाहतूक सायन पनवेल मार्गावरुन होत नव्हती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी निर्माण झाली नाही. मात्र आज दिवसभर पावसाची संततधार अशीच कायम राहिली, तर मात्र मुंबईच्या वेगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातही रात्रभर पावसाचा जोर कायम होता.
आजपासून पुढचे तीन दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईला येलो तर रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे किनारी भागातील लोकांनी काळजी घेण्याचं आव्हान करण्यासोबत सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, नवी मुंबई या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई, नवी मुंबईसह ठाण्यात अतिवृष्टीची शक्यता असल्यानं स्थानिक प्रशासकीय आणि आपत्कालीन यंत्रणांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज, उद्या आणि परवा जोरदार पावसाची शक्यताय. तर शनिवारी पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.