राऊतांकडून शिंदे – अजितदादा गटाला टोला अन् ‘या’ नेत्याचं कौतुक; म्हणाले इतिहास यांना…
Saamana Editorial on Hemant Soren Eknath Shinde and Ajit Pawar : सध्याच्या राजकीय वातावरणात सगळेच नितीश कुमार, अजित पवार किंवा एकनाथ मिंधे नसतात; राऊतांचा थेट निशाणा. सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीकास्त्र, वाचा सविस्तर...
मुंबई | 06 फेब्रुवारी 2024 : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांचं कौतुक करण्यात आलं आहे. हेमंत सोरेन रडले नाहीत, झुकले नाहीत! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात सगळेच नितीश कुमार, अजित पवार किंवा एकनाथ मिंधे नसतात, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
भ्रष्टाचार, खून, बलात्कार, दरोडेखोरी करून भाजपात गेल्यावर अभय व मुक्ती मिळते व जे या दरोडेखोरीत सामील होण्यास नकार देतात त्यांना राजभवनात अटक करून तुरुंगात टाकले जाते. देशात हेच सुरू आहे. अरविंद केजरीवाल झुकायला तयार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी झुकण्यास नकार दिला. ममता बॅनर्जी लढायला सिद्ध आहेत. हेमंत सोरेन यांनी गुडघे टेकले नाहीत, रडले नाहीत व झुकले नाहीत. एखाद्या क्रांतिवीराप्रमाणे त्यांनी तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. या लढ्यातूनच देशाला नवी दिशा व स्वातंत्र्याचा प्रकाश मिळेल. जे झुकले, शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही. हेमंत सोरेन यांनी लढणाऱयांच्या अश्रूंचे मोल सांगितले. त्या अश्रूंतूनच उद्याचे वादळ निर्माण होईल!
अजित पवार, एकनाथ मिंध्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. ते मोदींना प्रिय झाले; पण सोरेन, केजरीवाल हे त्यांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरले. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाऱयांचा पुंटणखाना बनला आहे व तेथे नीतिमत्ता, चारित्र्य अशा शब्दांना मोल उरले नाही. हेमंत सोरेन यांचा तुरुंगवास हा स्वाभिमान व स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना आदर्श ठरावा.
हेमंत सोरेन विश्वासदर्शक ठरावाचे मतदान करण्यासाठी झारखंड विधानसभेत पोहोचले तेव्हा त्यांच्या आमदारांच्या भावना अनावर झाल्या. अनेकांना हुंदके फुटले. जणू स्वातंत्र्य रक्षणासाठी ते सभागृह स्वाभिमानाच्या अश्रूंनी भिजले. त्या भावविवश वातावरणात हेमंत सोरे यांनी जे वक्तव्य केले ते ऐतिहासिक ठरावे.