संजय राऊतांचा भाजपच्या मंत्र्याला खोचक टोला; ‘ते’ आधी शिवसेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये अन् आता भाजपमध्ये, त्यांच्यावर…
Sanjay Raut on BJP Leader : 'त्यांना' पक्षांतराची जाण नाही, त्यांनी...; संजय राऊतांचा भाजपच्या मंत्र्याला खोचक टोला. 'ते' आधी शिवसेनेत होते म्हणत भाजपमधील मंत्र्यावर संजय राऊतांनी शाब्दिक हल्ला का चढवला? टँकर चालकांच्या संपावर संजय राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...
मुंबई | 02 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याला खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन-दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी विखे पाटील यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान कुठूनही प्रचार करतील. चांद्रयान 3 चंद्रावर गेलं होतं. ते तिथूनही प्रचार करतील, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
राऊत काय म्हणाले?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काम केलंय. त्यांनी अनेक पक्ष बदलले. ते आधी शिवसेनेत होते. मग काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपमध्ये आहेत. असे जे नेते असतात ज्यांना पक्षांतरविषयी फार जाण नसते. ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. त्यांच्यावर आता मी काय बोलणार? कोण जातंय कोण राहातंय हे येणारा काळ ठरवेल. पण उद्या भाजपकडे सत्ता नसेल तर तेव्हा विखे पाटील कुठे असणार आहेत? याचाही विचार करून ठेवा, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
विखे पाटील काय म्हणाले होते?
भाजपचे नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक विधान केलं होतं. काँग्रेसमधील अनेक लोकांची इकडे येण्याची इच्छा आहे. काँग्रेसला सध्या नेतृत्व कुठे आहे? वाटाघाटी करायला फक्त नेते येत आहेत. वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा होत आहे. त्यामुळे अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपमध्ये यायचं आहे, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यावरून संजय राऊतांनी टोला लगावला आहे.
टँकर चालकांच्या संपावर राऊत म्हणाले…
महाराष्ट्रमध्ये फक्त पेट्रोल डिझेलच्या संपावरूनच गोंधळ नाही. तर मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाला. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. केंद्रातील नेत्यांची चर्चा करणार गरजेचं आहे, असंही राऊत म्हणाले.