Mumbai School reopen guidelines : 4 तारखेपासून शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची परवानगी गरजेची, संपूर्ण नियमावली!
मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत.
मुंबई : मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे. तसंच विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
कोरोना आजूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. विदयार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शाळेसाठी नियमावली काय?
-एका बेंचवर एक विद्यार्थी -शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक -सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा -एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश -सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक -मास्क परिधान करणे आवश्यक -सॅनिटायजर वापरणं गरजेचं
70 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण
मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.
कोरोना नियम पाळून राज्यातील शाळा सुरु होणार
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.
पालकांची संमती महत्त्वाची
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
मुंबईत कोरोना रेट कमी
मुंबईत कोरोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, 15% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच 85% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
हे ही वाचा :
मोठी बातमी! मुंबईतल्या शाळा सुरु होणार का? महापौर म्हणतात, दोन दिवसात आढावा