मुंबईतील सी लिंकवर गाडीचा तुफान वेग, सहा गाड्यांना उडवले, तिघांचा मृत्यू
Mumbai Sea Link Terrible accident : मुंबईतील सी लिंकवर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. सी लिंकवर सुसाट गाडी चालवणाऱ्या इनोव्हा गाडीच्या चालकाने एकामागे एक सहा गाड्यांना उडवले. त्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच नऊ जण जखमी झाले आहे. अपघात करुन इनोव्हा चालक फरार होण्याच्या तयारीत होता.
रमेश शर्मा, मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील वांद्रे येथील सी लिंकवर गुरुवारी रात्री भीषण अपघात झाला. इनोव्हा चालकाने सुसाट गाडी चालवत सहा गाड्यांना धडक दिली. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. नऊ जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी एका व्यक्तीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पाच जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रात्री 10.15 वाजता झाल्याची माहिती मुंबई झोन 9 चे DCP कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली. टोल प्लाजाच्या 100 मीटरपूर्वी हा अपघात झाला. चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे. सर्व गाड्या वरळी ते वांद्रेच्या दिशेने जात होत्या. इनोव्हा कारमध्ये चालकासह एकूण सात प्रवासी होते. अपघात करणारा चालकही जखमी आहे. त्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
खातीजा सुलेमान हाटिया, हवागोरी हनीफ पीर आणि मोहम्मद हनीफ आदम पीर या तिघांचा मृत्यू झाला. तर हसीम सुलेमान सदर, हाजरा समद सदर, बीबी याकुब सदर, राजश्री दवे, राकेश विश्वकर्मा हे सहा जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची परिस्थिती चिंताजनक आहे.
गाडीचा अतिवेगामुळे अपघात
वांद्रे सी लिंकवर रात्री 10.15 वाजता इनोव्हा कार जात होती. त्यावेळी टोल नाक्याजवळ काही वाहने रांगेत उभे होते. मागून वेगाने येणाऱ्या गाडीने आधी मर्सिडीज गाडीला धडक दिली. त्यानंतर एकामागे एक सहा गाड्यांना धडक दिली. हायस्पीड आणि आधी जाण्याच्या घाईमुळे अनेक गाड्यांना इनोव्हा कारने धडक दिली. या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी तातडीने पाच रुग्णावाहिका दाखल झाल्या. त्यानंतर रुग्णांवर त्वरित उपचार सुरु झाले. अन्यथा मृतांची संख्या वाढली असती. जखमी असलेल्या नऊ जणांपैकी तिघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
चालक पळून जाण्याच्या तयारीत
अपघातानंतर घटनास्थळावरुन चालक पळून जाण्याच्या तयारीत होता. जखमी अवस्थेत तो फरार होत होता. परंतु त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या अपघातामुळे रात्री सी लिंकवरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. कार चालक गुजरातमधील 45 वर्षीय व्यक्ती असल्याचे सांगण्यात येत आहे.