मुंबई : मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या (Mumbai Traffic Police) कर्तव्यदक्षतेचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Traffic Police Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलीस हिरीरीनं वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काम करताना पाहायला मिळालाय. एका रुग्णवाहिकेला जागा करुन देण्यासाठी ट्रॅफिक पोलिसाने आपल्या जेवणाचा घास बाजूला ठेवला आणि रुग्णवाहिकेला वाट करुन दिल. त्याच वेळचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जातंय. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. विलास गुरव (Vilas Gurav) असं या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाचं नाव आहे. मुंबईच्या वरळी भागात ते ड्युटीवर असताना हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला.
मुंबई आणि मुंबई पोलीसांना सहाय्यक फौजदार विलास गुरव तुमचा अभिमान आहे ?
हे सुद्धा वाचाMumbai and Mumbai Police are proud of you ASI Vilas Gurav ?#MumbaiFirst #ServingWithPride #KhakiSwag pic.twitter.com/78GY8d6EHU
— पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई – CP Mumbai Police (@CPMumbaiPolice) September 16, 2022
पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचारी विलास गुरव यांचं कौतुक केलं. विलास गुरव यांनी केलेलं काम पोलीस वर्दीचा अभिमान आणखी वाढवतो, असं ते म्हणालेत.
व्हायरल झालेला व्हिडीओ 13 सप्टेंबरचा आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास गुरव हे वरळी नाका इथं ड्युटीवर होते. दुपारच्या जेवणासाठी त्यांनी ब्रेक घेतला होता. इतक्यात त्यांना रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू आला. एक रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी जेवण बाजूला ठेवलं आणि थेट वाहतूक कोंडीच्या दिशेनं धावले.
विलास गुरव यांनी प्रसंगावनधान राखत तातडीने वाहतूक कोंडी सोडवली. त्यासाठी त्यांनी दोन सिग्नलही थांबवले. व्हायरल व्हिडीओमध्ये रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो आहे. रुग्णवाहिकेला जायला जागा मिळावी यासाठी विलास गुरव यांनी केलीली ही कृती एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली.
विलास गुरव यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तसंच त्यांनी केलेल्या कृतीचं लोकांकडूनही कौतुक होताना पाहायला मिळतंय. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडूनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
जेव्हा विलास गुरव यांना आपण बजावलेल्या कर्तव्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रियाही बोलकी होती. वर्दीचा योग्य मान राखला पाहिजे, त्यामुळे चांगलं काम केल्यावर मनाला समाधान मिळतं, असं विलास गुरव यांनी म्हटलं आहे.