Mumbai Pune Road : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडनं थेट पुण्यात! वेळ अन् इंधनाची होणार बचत; काय आहे प्रकल्प?
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाद्वारे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिर्ले गाव ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे असा एमटीएनएल एक्स्टेंशन प्रकल्प 2023पर्यंत तयार होणार आहे.
मुंबई : वेगवान वाहतुकीसाठी मुंबई-नवी मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (Mumbai Trans Harbor Link Road) आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासात वेळ आणि इंधनाची (Fuel) बचत होणार आहे. कारण लांबून वळसा घालायची गरज आता पडणार नाही. या प्कल्पासाठी 2 हजार 639 कोटी रुपयांच्या कर्जाच्या उभारणीसाठी राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. हा लिंक रोड जवळपास 22 किलोमीटरचा असून 16.5 किलोमीटरचा मार्ग समुद्रातून आणि 5.5 किलोमीटर अंतराचा मार्ग जमिनीवरून जातो. या प्रकल्पाची (Project) अंदाजित किंमत 17 हजार 843 कोटी रुपये आहे. सरकारने एमटीएचएल प्रकल्पासाठी जायका या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेकडून घ्यावयाच्या कर्जासाठी 15 हजार 100 कोटी रुपयांच्या मर्यादेत शासन हमी दिली आहे.
प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी निधीची आवश्यकता
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाच्या दृष्टीने प्राधिकरणाद्वारे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिर्ले गाव ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे असा एमटीएनएल एक्स्टेंशन प्रकल्प 2023पर्यंत तयार होणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी प्राधिकरणास निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मेगा सिटी स्कीम फंडातून एकूण 2 हजार 649 कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
शासन हमी देणार नाही
मुंबई मेगासिटी स्कीम रिव्हॉल्व्हिंग फंडातून घ्यायच्या कर्जाचा विनियोग केवळ एमटीएचएल एक्स्टेंशन प्रकल्प म्हणजेच चिर्ले ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रकल्पासाठी करणे अनिवार्य आहे. या प्रकल्पाच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शासन हमी देणार नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उत्पन्नस्रोतांचा आढावा घेऊन उत्पन्नवाढीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. यात्पूर्वी उभारलेल्या कर्जाची सव्याज परतफेड विहित कालावधीत करणे आवश्यक आहे.