सिनेट निवडणुकीत शिंदे सरकारचा पुन्हा हस्तक्षेप? दोन दिवसांवर मतदान असताना मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा निवडणूक स्थगित
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. सिनेट निवडणुकीसाठीचं मतदान दोन दिवसांवर असताना मुंबई महापालिकेने आज रात्री आठ वाजता प्रसिद्धी पत्रक जारी करत सिनेट निवडणूक पुढे ढकलली आहे.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थागित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीसाठी दोन दिवसांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला मतदान होणार होतं. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध ABVP अशी थेट लढत होणार होती. पण अचानक या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. दोन दिवसावर मतदान आलं असताना अचानक सिनेट निवडणूक स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करुन माहिती देण्यात आली आहे.
“महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२) (न) [28(2) (t)] प्रमाणे (१०) नोंदणीकृत पदवीधरांच्या संघाच्या निवडणूकीची निवडणूक अधिसूचना ३ आगस्ट, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेमध्ये नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होती”, असं पत्रकात सुरुवातीला म्हटलं आहे.
पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे?
“उपरोक्त निवडणुकीच्या अनुषंघाने संबंधित मतदारांना, उमेदवारांना, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासना कडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणारी नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. याबाबत ची नोंद सबंधित मतदारांनी, उमेदवारांनी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणुक अधिकारी, मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्गानी घ्यावी ही विनंती”, असं पत्रकात म्हटलं आहे.
‘मिंधेची गद्दार टोळी निवडणुकीला इतकी घाबरलेली…’
शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणूक स्थगित केल्यावरुन शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. “पदवीसाठी मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्याने भाजप आणि बेकायदेशीर मिंधे संघटना किती घाबरले आहेत हेच दिसून येते. मिंधेची गद्दार टोळी निवडणुकीला इतकी घाबरलेली आहे की त्यांनी मतदानाच्या एक दिवस आधी मुंबई विद्यापीठ सिनेटची निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आता त्यांनी लोकशाहीचे काय केले हे जगाने पाहावे असा हा प्रकार आहे. त्यांना निवडणुकीची भीती वाटते आणि ते वन नेशन, वन पोलची चर्चा करतात, किती लाजिरवाणे, भ्याड गदार निवडणुकीला कात्री लावतात”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
The cancellation of the Mumbai University Senate election for Graduation only shows how scared the bjp and the illegal cm, mindhe, are of the Yuva Sena- a youth organisation.
Mindhe’s gaddaar gang is so scared of elections that they order the cancellation of the MU Senate…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 20, 2024
‘कुलगुरू हे भाजप आणि शिंदे गटाच्या स्क्रिप्टनुसार…’
छात्र भारतीचे सिनेट उमेदवार रोहित ढाले यांनी महापालिकेच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. “दोन दिवसात सिनेट निवडणूक होणार होती आणि आज अचानक रात्री 8 वाजता परिपत्रक काढून सिनेट रद्द केली. विद्यापीठ आणि कुलगुरू यांचा आम्ही निषेध करतो. मागच्या तीन वर्षात दोनवेळा ही निवडणुक रद्द केली. भाजप आणि शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार कुलगुरू आणि विद्यापीठ चालत आहे. निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नसेल तर राज्य करण्याचा तुमचा अधिकार नाही. कुलगुरू हे भाजप आणि शिंदे गटाच्या स्क्रिप्टनुसार चालत आहेत”, असा घणाघात रोहित ढोले यांनी केलाय.