गर्ल्स हॉस्टेलच्या टॉयलेटमध्ये पाण्याची बोंबाबोंब; जागतिक दर्जाच्या मुंबई विद्यापीठात चाललंय काय?
मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात पुन्हा एकदा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसतिगृहात पाणी येत नसल्याने या विद्यार्थींनीची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेकदा तक्रार करूनही हा प्रश्न सोडवला जात नाहीये.
मुंबई : जागतिक दर्जाच्या मुंबई विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरू झाली आहे. या हॉस्टेलमध्ये गेल्या आठ महिन्यापासून पाणीच येत नाहीये. हॉस्टेलमधील टॉयलेट आणि बाथरूममध्ये पाणी येत नसल्याने हॉस्टेलमधील विद्यार्थींनीची प्रचंड गैरसोय झाली आहे. अनेकदा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने या विद्यार्थींनी प्रचंड संतप्त झाल्या आहेत. या संतापाचा भडका उडाल्याने या विद्यार्थींनी काल आंदोलन केलं.
मुंबई विद्यापीठातील धोंडो केशव कर्वे गर्ल्स हॉस्टेलमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणीच येत नाहीये. त्यामुळे या हॉस्टेलमधील तरुणींची गैरसोय होत आहे. ही समस्या सोडवण्यासारखी आहे. पण विद्यापीठ प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जातन नाही. आम्ही याबाबत तक्रार करण्यासाठी हॉस्टेलच्या वॉर्डनला भेटायला गेलो. पण त्यांनी आम्हाला भेट दिली नाही. काही महिन्यांपूर्वी आम्ही याबाबतची तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला नाही. त्यामुळेच म्ही स्टाफ क्वार्टर्स बाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, असं एका विद्यार्थीनीने सांगितलं.
70 विद्यार्थींनीची गैरसोय
या हॉस्टेलमध्ये एकूण 70 विद्यार्थीनी आहेत. हॉस्टेलमध्ये पाणीच येत नाही. त्यामुळे पाण्याशिवाय आम्ही आमची कामं कशी करणार? वॉर्डनही याबाबत आम्हाला भेटून काही सांगत नाही. काही सांगणं सोडाच. पण साधी भेट देण्याचीही तसदी देत नाही, असं सांगतानाच आम्ही इतर हॉस्टेलपेक्षा या हॉस्टेलमध्ये मेसचे सर्वाधिक पैसे मोजतो, असं दुसऱ्या विद्यार्थीनीने सांगितले.
टँकर्सने पाणी पुरवठा करण्याचे आदेश
अनेक महिन्यांपासून विद्यार्थींनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे, असं माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितलं. तर, मुलींच्या वसतिगृहात पाण्याची कमतरता असेल तर वॉटर टँकरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने म्हटलं आहे.