पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले ? पुढचे नियोजन काय ?
दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये पाणी साचते. त्यामुळे होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरूपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत.
मुंबई : सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यात आऊटफॉल, पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुंबई पालिकेकडून आढावा घेतला. यावेळी पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोडच्या कामात बाधा येणार नाही तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादरीकरणाद्वारे दिली. (Mumbai was flooded in first rain what municipal corporation done so far what is planning ahead Uddhav Thackeray)
77 आऊटफॉलची साफसफाई, पंप्स कार्यान्वित
प्रियदर्शिनी पार्क, चौपाटी, वरळी सी-फेस अशा ठिकाणी एकंदर 77 पातमुखे आहेत. त्यातील 43 हे समुद्रकिनाऱ्याला समांतर असे आहेत. सर्व पातमुखांची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली आहे. अमरसन्स इंटरचेंज, हाजी अली इंटरचेंज, चौपाटी याठिकाणी पुरेशा क्षमतेचे पंप्स बसविण्यात आले आहेत. कोस्टल रोडला लागून 15 ठिकाणी असे 63 पंप्स आहेत. या सर्व उपायोजनांमुळे सध्याच्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा वेळोवेळी होऊन पाणी साचणार नाही तसेच कामातही बाधा येणार नाही अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
सागरी मार्गाचे 36 टक्के काम पूर्ण
10.58 किमीच्या या सागरी मार्गाचे काम 36 टक्के पूर्ण झाले असून या प्रकल्पावर एकूण 12 हजार 721 कोटी खर्च येणार आहे. प्रत्येकी तिहेरी मार्गाचे दोन मोठे बोगदे यात बांधण्यात येत आहेत. 15. 66 किमीचे इंटरचेंजेस मार्गदेखील यामध्ये असणार आहेत. आत्तापर्यंत बोगदा खणण्याचे काम 9 टक्के, रिक्लेमेशन 90 टक्के, सागरी भिंत 68 टक्के अशी कामाची प्रगती आहे.
पाणी साचू नये म्हणून मोठ्या भूमिगत टाक्या
यावेळी विशेषत: हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी- कुर्ला सायन रेल्वे स्थानक परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना दिली. दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये पाणी साचते. त्यामुळे होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरूपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये कसे साठविण्यात येईल याविषयीची चित्रफितही दाखविण्यात आली.
हिंदमाता परिसरात वाहतूक थांबली नाही
पुढच्या वर्षीपासून या कामामुळे हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल असेही यावेळी सांगण्यात आले. यंदा परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाण पुलादरम्यान जोडरस्ता असून दोन्ही पुलांच्या मधील रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहिली असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.
गाळ काढण्याच्या कामाचे संगणकीय नियंत्रण
9 जून रोजी मुंबईत 20 ठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाउस झाला तर 11 ठिकाणी 150 मिमी ते 200 मिमी, 13 ठिकाणी 100 मिमी ते 150 मिमी आणि 3 ठिकाणी 100 मिमीपेक्षा कमी पाउस झाला. मुंबईत पुराचे पाणी साचण्याची 386 ठिकाणे असून 171 ठिकाणांवर पाणी साचणार नाही किंवा लगेच निचरा होईल यासाठी उपाययोजना केली आहे. जूनअखेर इतर ठिकाणांची कामेही पूर्ण होतील. 24 प्रभागात 6 मीटरपेक्षा कमी रुंद नाल्यांची 100 टक्के साफसफाई झाली आहे. नाल्यातून गाळ काढणे व त्याची मुंबईबाहेर विल्हेवाट लावणे या संपूर्ण प्रक्रियेवर संगणकीय पद्धतीने नियंत्रण ठेवले जाते. प्रत्येक वाहनाच्या फेऱ्या, वाहून नेलेला गाळ, वजन याची छायाचित्रांसह व्यवस्थित नोंद ठेवली जाते याविषयी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी माहिती दिली.
इतर बातम्या :