मुंबईकरांसाठी खुशखबर, आता पाण्याची चिंता सोडा, पाणीप्रश्नावर व्यवस्थित तोडगा
मुंबई शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय. परंतु त्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. यामुळे या सुविधा वाढवण्यावर मुंबई मनपाने भर दिला आहे.
मुंबई : पाणी पुरवठ्याबाबत मुंबईकरांसाठी (Mumbai Water) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वारंवार पाणी कपातीला सामोरे जावे लागणाऱ्या मुंबईकरांची चिंता लवकरच मिटणार आहे. मुंबईकरांना गोडे पाणी देण्यासाठी सरकारने (maharashtra government) आराखडा तयार केला आहे. यामुळे लवकरच मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाला असून, मार्च अखेरपूर्वी निविदा काढली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.मुंबई महानगर पालिकेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन ते चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
मुंबई शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढलीय. परंतु त्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण झाल्या नाहीत. यामुळे या सुविधा वाढवण्यावर मुंबई मनपाने भर दिला आहे. त्यासाठी समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी मनोरी येथे उभारण्यात येणारा नि:क्षारीकरण प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. प्रकल्पाची संकल्पचित्रे, आरेखन तसेच बांधकामाचे पर्यवेक्षण यासह अन्य अभ्यास पूर्ण झाला आहे. मात्र गेल्या वर्षभरापेक्षा यंदा प्रकल्प अधिक चर्चेत असतानाच मुंबई महापालिकेकडून त्याला गती देण्यात येत आहे.आता प्रकल्पासाठी मार्च अखेरपूर्वी निविदा काढली जाणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन ते चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना २०० दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे.
कसा होतो मुंबईला पाणीपुरवठा
मुंबईला सात धरणांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यातच एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत असल्याने वाढत्या लोकसंख्येची गरज भागवणार कशी असा प्रश्न पडतो.
मुंबईला दैनंदिन लागणारी पाण्याची गरजेपेक्षा कमी पाणी मिळते. त्यातच दिवसाला २५ ते ३० टक्के होणारी पाणी गळती आणि चोरी पाहता मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. परंतु आता नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे अधिकच्या पाण्याची गरज भागणार आहे.
कुठे आहे प्रकल्प
मुंबईकरांची पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने मनोरी येथे १२ हेक्टर जागेवर प्रकल्प उभारणार आहे. समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार वर्षांत हा प्रकल्प पुर्ण होणार आहे.