थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पालिका, पोलीसांची करडी नजर, नवे नियम जाहीर, 6 फुटांचे अंतर बंधनकारक
ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षाही घातक विषाणू आहे आणि त्याची लागण तिप्पट वेगानं होते, ते रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे सर्व उपाय अंमलात आणा असही केंद्रानं राज्यांना कळवलंय. ओमिक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी वॉर रुम तयार करायलाही सांगितलं आहे.
तुम्ही नववर्षाच्या स्वागताची तयारी करत असाल आणि मुंबईतच त्याचा प्लॅन करत असाल तर मुंबई महापालिकेनं (BMC Omicron rules) तयार केलेली नियमावली वाचणं गरजेचं आहे. कारण नियम पाळले नाही तर नवीन वर्षाची सुरुवात पोलीसी तसच पालिकेच्या खाक्यानं होऊ शकते. मुंबई पालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी नवीन नियमावली जाहीर केलीय आणि त्यानुसार 200 माणसं एकत्र येणार असतील तर त्यासाठी वॉर्डच्या सहाय्यक आय़ुक्ताची लेखी परवानगी आवश्यक आहे. तसच दोन माणसांमध्ये 6 फुटाचं अंतरही ठेवावं लागणार. याशिवाय मुंबई पोलीसांची (Mumbai Police watch) करडी नजर असेल ती वेगळीच. त्यामुळेच बीएमसीनं जारी केलेली नियमवाली एकदा वाचलेली बरी.
काय आहेत नियम?
- मुंबईत ओमिक्रॉनचा धोका वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर आठवड्याभरातच दोनदा बदल करण्यात आलाय.
- म्हणजे जिथं 1 हजार लोकांना एकत्र यायला परवानगी होती तिथं आता फक्त 200 लोकांनाच एकत्र येता येणार आहे. त्यातही दोन व्यक्तीच्या दरम्यान 6 फुटाचं अंतर बंधनकारक आहे.
- कुठलाही कार्यक्रम मग तो राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक असो की घरगुती, सभागृह क्षमतेच्या 5० टक्के इतक्याच उपस्थितीला मंजुरी आहे.
- मोकळ्या जागेत कार्यक्रम होणार असेल तर त्याला क्षमतेच्या 25 टक्के एवढ्याच संख्येला मंजुरी देण्यात आलीय. सगळ्या परवानग्या लेखी घेतल्यानंतर त्याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेशही संबंधीत पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेत.
- ज्या ठिकाणी लोक एकत्र जमतायत तिथं सॅनिटायझेशन, मास्कची व्यवस्था असली पाहिजे.
- थर्टी फर्स्ट किंवा नाताळ, किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात हजेरी लावणाऱ्यांचे दोन डोस झालेलं असणे बंधनकारक आहे.
पुन्हा 11 रुग्ण
मुंबईसह राज्यात ओमिक्रॉनचे 11 नवे रुग्ण सापडलेत. त्यात एकट्या मुंबईत 8 जण तर पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, नवी मुंबईत प्रत्येक एक जण सापडला आहे. त्यामुळे राज्यातली ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता 65 वर गेली आहे. तर आतापर्यंत 34 जणांनी ओमिक्रॉनवर यशस्वी मात केलेली आहे.
का नियम पाळणे गरजेचे ?
मुंबईत कोरोनानं दिलासा दिला असला आणि त्याची गती कमी झाली असली तरीसुद्धा ओमिक्रॉनचा धोका मात्र कायम आहे. म्हणजे कोरोनाचे रुग्ण कमी झालेत असं चित्रं निर्माण होत असतानाच ओमिक्रॉनचे वाढतायत असं दिसतंय. महाराष्ट्रात सध्यस्थितीत 65 ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. यूरोप, अमेरीकेत ओमिक्रॉननं थैमान घातलंय. तिथं नववर्ष, नाताळ सर्वांवर बंधनं आलीयत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे तसेच नव्यानं जाहीर केलेले निर्बंध पाळणे गरजेचे आहे. ओमिक्रॉनचा धोका वाढू नये म्हणून रोज दीड ते दोन लाख लोकांची तपासणी केली जातेय. परदेशातून येणाऱ्या नागरीकांवर वॉच ठेवला जातोय. त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातायत.
केंद्राचे राज्यांना निर्देश
फक्त महाराष्ट्रच नाही तर केरळ, दिल्लीतही ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडतायत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रानं राज्य सरकारला नाईट कर्फ्यू लावण्याचे निर्देश दिलेत. ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षाही घातक विषाणू आहे आणि त्याची लागण तिप्पट वेगानं होते, ते रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे सर्व उपाय अंमलात आणा असही केंद्रानं राज्यांना कळवलंय. ओमिक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी वॉर रुम तयार करायलाही सांगितलं आहे.
हे सुद्धा वाचा:
VastuTips : रोजची कटकट, सतत भांडणं, यावर उपाय हवाय ? मग या 4 गोष्टी करुन पाहा