कृष्णा सोनारवाडकर , मुंबई, दि.18 डिसेंबर | महाराष्ट्रातील लहान लहान गावात अतिरेकी निर्माण करण्याचे काम सिरियातून सुरु आहे. राष्ट्रीय तपास संस्थे म्हणजे एनआयएने मागील आठवड्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात छापे मारले होते. त्या छाप्यात भिवंडीमधील पडघा गावातील १५ जणांना अटक करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे या गावास सिरिया बनवण्याची पूर्ण तयारी अतिरेक्यांनी केली होती. एनआयएच्या छाप्यातून ही माहिती उघड झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात देशभरातील दहशतवादी कारवायांसाठी युवकांना जमवण्याचे काम सुरु होते. या गावाला दहशतवाद्यांनी “स्वतंत्र” जाहीर करुन त्याचे नामांतर “अल् शाम” करुन ठेवले होते. आता अमरावती जिल्ह्यात एनआयएचे पथक दाखल झाले आहे. अमरावतीमधील अचलपूर गावातील काही जणांना ताब्यात घेतले आहे.
देशभरात १९ ठिकाणी एनआयएची छापेमारी रविवारी रात्रपासून सुरु केली आहे. त्या महाराष्ट्रातील अमरावतीच्या अचलपूरमध्येही एनआयएचे पथक पोहचले. महाराष्ट्र एटीएसला सोबत घेऊन अचलपूरमध्ये कारवाई सुरु केली. या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी सकाळीसुद्धा सुरु होती. यावेळी या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गावा गावापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. यामुळे राज्यात दोन आठवड्यापासून धडक कारवाया सुरु आहेत. अचलपूरमधील कारवाईत मोठी माहिती एनआयएच्या हातात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अचलपूरमधील काही तरुण सिरियातील इसिसच्या संपर्कात आले. त्यांना सिरियामधील हँडलकडून संदेश मिळू लागले. इसिस या दहशतवादी संघटनाच्या संपर्कात अचलपूरमधील काही तरुण आल्याची माहिती एनआयएला मिळाले. त्यानंतर रविवारी रात्री एनआयएचे पथक अमरावतीमध्ये पोहचले. त्यांनी चौकशी सुरु केली. जिहादी आतंकवाद्यांना मोडीत काढण्यासाठी एनआयएने ऑपरेशन सुरु केले. कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड आणि नवी दिल्लीत एनआयएची ही कारवाई सुरु आहे. कर्नाटकमधील ११ ठिकाणी छापेमारी सुरु आहे.