मुंबईः स्वतः जुमलेबाज असणारे इतरांची काय पोलखोल करणार, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केलीय. ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Municipal Elections) तोंडावर भाजपने पोलखोल अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेचा भ्रष्टाचार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामाची चिरफडा पक्षाच्या वतीने करण्यात येतेय. त्यात आज चेंबूरमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या उपस्थित पोलखोल अभियानच्या रथाचे उदघाटने केले जाणार होते. मात्र, तत्पूर्वीच या रथाची तोडफोड केल्याचे समोर येत आहे. यावरून प्रवीण दरेकर यांनी चेंबर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. या प्रकरणाच्या आरोपीला आज अटक केली नाही, तर उद्या पुन्हा चेंबर पोलीस ठाण्यासमोर येऊन आंदोलन करू, असा इशारा देण्यात आलाय. या पोलखोल अभियानामुळे मुंबईत पुन्हा एकदा वादंग पेटले आहे. यावरून पटोले यांनी भाजपवर टीका केलीय.
नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस नेहमी जनतेच्या प्रश्नावर लढते. उत्तर प्रदेशात लोकांनी गायीच्या कोठ्यात गाड्या नेऊन ठेवल्या आहेत. त्यांना आता कळाले की, भाजपने देशाचे वाटोळे केले आहे. मोंदीची 2014 ची भाषणे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून जनतेला एकवत आहोत. 56 इंचाचे छाती असणारे पंतप्रधान महागाई रोखू शकले नाहीत. त्यामुळे आता आम्ही आंदोलनातून त्याच्या भाषणाची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत.
नाना पटोले म्हणाले की, जुमलेबाजाचे काही काळ असतो, पण आता त्यांचा काळ संपत आला आहे. लोकांना जुमलेबांजाचा खरा चेहरा समजला आहे. राज्यात विजेचा प्रश्न मोठा आहे. ऊर्जा विभागाचे खाते काँग्रेसकडे आहे. लोकांना वीज मिळावी यासाठी आम्ही तिन्ही पक्ष आणि सरकार मिळून काम करतोय. धार्मिक तेढ आणि जातीयता निर्माण करणाऱ्या लोकांवर कारवाई का करण्यात आली नाही. याबद्दल काँग्रेस मंत्रिमंडळ बैठकीत विचारणा करणार आहे. राहुल गांधी या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.