राहुल गांधी अन् नरेंद्र मोदी यांच्यांत एकदा वादविवाद होऊ द्या, नाना पटोले का म्हणाले?
जसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांना करावे की अजित पवार यांना करावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला दुसरी जबाबदारी दिली. त्यामुळे मी राजीनामा दिला.
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानीसंदर्भात लोकसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु ते सर्व लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकले. कामकाजातून काढावे असे ते प्रश्न होते का? कोणते प्रश्न कामकाजातून काढले जातात? मोदीजी पंतप्रधान पदावर आहेत. परंतु परवा त्यांनी लोकसभेत छातीठोकपणे भाषण केले. ते त्या पदाला शोभत नाही. मी हे बोललो तर म्हटले जाते की मी नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका करतो. परंतु एकदा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यांत एकवेळा वादविवाद होऊ द्या. मग सर्व जनतेसमोर येईल, पब्लिक सब जानती है, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. टीव्ही ९ मराठी आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.
हा विषय पक्षातंर्गत होता
नाना पटोले विधानसभा अध्यक्ष असते तर सरकार पडले नसते, त्यांनी राजीनामा देण्यास नको होतो. यासंदर्भात आम्हाला विश्वासात घेतले नव्हते, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले होते, त्या प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष म्हणून मला पक्षाने संधी दिली होती.
यामुळे पक्षाने सांगितले तेव्हा मी राजीनामा दिला. हा आमचा पक्षाचा विषय होता. जसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांना करावे की अजित पवार यांना करावे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच आमच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला दुसरी जबाबदारी दिली. त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यासंदर्भात उद्धव ठाकरे व अजित पवार यांना सांगितले होते, असे नाना पटोले यांनी सांगितले.
…तर सरकार कोसळणार
सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्यापासून सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीत १६ आमदार अपात्र ठरतील, असा विश्वास आम्हाला आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकारच कोसळणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
पुणे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीत आमचा विजय होणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. आपण आपल्या कारकिर्दीत पक्षाला चौथ्यावरुन दुसऱ्या क्रमांकावर घेऊन आलो, हे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतून सिद्ध झाले, असे नाना पटोले यांनी सांगितले.