महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप, नाना पटोले तात्काळ दिल्लीला?; दिल्लीत काय घडणार?
काँग्रेसशी कायम एकनिष्ठ असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसशी काडीमोड घेतला आहे. चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देतानाच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षात प्रचंड खळबळ उडाली आहे. चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसचे मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतानाच आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला प्रचंड मोठं खिंडार पडलं आहे. काँग्रेसमध्ये एक प्रकारे भूकंपच आला आहे. काँग्रेसमधील या मोठ्या पडझडीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता दिल्लीतही मोठ्या घडामोडींना वेग येणार आहे.
देवरा आणि चव्हाण कुटुंब हे काँग्रेसी कुटुंब म्हणून ओळखलं जातं. काहीही झालं तरी हे दोन कुटुंब काँग्रेसशीच जोडून राहील असं सांगितलं जात होतं. पण मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं पत्रच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवले आहे. त्यानंतर चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
पटोले दिल्लीला?
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले हे दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन नाना पटोले चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या महिन्याभरातील काँग्रेसला हा दुसरा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कट्टर काँग्रेसी लोकांनीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर पटोले आणि हायकमांडच्या भेटीत काय चर्चा होते आणि काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले सर्वा कार्यक्रम रद्द केले आहेत.
बंगल्यावर शुक शुकाट…
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. नांदेड जिल्हा अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. परंतु नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांना देखील अशोक चव्हाण यांनी काँग्रेसपदाचा राजीनामा दिल्याची माहिती नाही. त्यांच्या नांदेड येथील निवस्थानी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.