राज ठाकरे आणि नारायण राणे एकत्र येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी सध्याचा काळ हा आव्हानाचा आहे. अशा परिस्थितीत त्यांना धक्का देणारी आणखी एक घटना आज घडलीय.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कुठलं राजकीय समीकरण नव्याने समोर येईल, याचा अंदाज नाही. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापन केली. त्यातून त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. शिवसेना आणि आघाडी यांच्यातील राजकीय वैर हे तीन वर्षांपूर्वी सर्वश्रूत होते. पण 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर हे वैर फार काळ टिकलं नाही. कारण भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत सरकार स्थापन केलं. पण हे सरकार अडीच वर्षात कोसळलं. त्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाचं आणि भाजपचं एकत्रित सरकार स्थापन झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा आव्हानाचा हा काळ आहे. अशा परिस्थितीत त्यांना धक्का देणारी आणखी एक घटना घडलीय. ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते नारायण राणे एकाच मंचावर एकत्र आले.
काही दिवसांपूर्वी मुंबईत ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं बघायला मिळालं होतं. त्या कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आपण पुढच्या निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आज नारायण राणे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले.
कोकण महोत्सवात दोन्ही नेते एकत्र
मुंबईतील भांडूप येथे कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला राज ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर एकत्र दिसले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे शिवसेना सोडल्यानंतर दोघे नेते आज पहिल्यांदाच असे एकत्र आलेले बघायला मिळाले. त्यामुळे आगामी काळात नारायण राणे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? अशा चर्चांना उधाण आलंय.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय वैर आहे. राणे नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत असतात. याशिवाय राज ठाकरे हे देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असतात.
नारायण राणे यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमातही उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्यासाठी दोन्ही नेते एकत्र येतील का? ते आगामी काळात स्पष्ट होईल.
नारायण राणे यांनी नुकतीच सपत्नीक राज ठाकके यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील संबंध दृढ होत असल्याचं मानलं जातंय. शिवतीर्थावरील भेटीनंतर आज राज आणि राणे एकाच मंचावर एकत्र दिसले.